नवजा, पाथरपुंज येथे नाही, तर यावर्षी 'या'ठिकाणी झाली सर्वाधिक पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:00 IST2025-07-16T13:59:26+5:302025-07-16T14:00:00+5:30
विकास शहा शिराळा : सातारा जिल्ह्यातील नवजानंतर पाथरपुंज येथे सर्वात जास्त पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी १ जूनपासून दि. ...

नवजा, पाथरपुंज येथे नाही, तर यावर्षी 'या'ठिकाणी झाली सर्वाधिक पावसाची नोंद
विकास शहा
शिराळा : सातारा जिल्ह्यातील नवजानंतर पाथरपुंज येथे सर्वात जास्त पाऊस पडला होता. मात्र, यावर्षी १ जूनपासून दि. १५ जुलैअखेर याच जिल्ह्यातील सांडवली या ठिकाणीसुद्धा पाथरपुंजबरोबर पाऊस पडला आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे २०१९ मध्ये चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे हे नाव जगाच्या पटलावर चर्चेत आले होते. यावर्षी मात्र दि. १५ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सांडवली येथे ३११२ मिमी तर पाथरपुंज येथे ३१३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आता सांडवली येथे पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.
याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले असून, तेथे २८७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हा पावसाच्याबाबत अग्रेसर आहे. कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सर्वात जास्त पाऊस पडतो.
यावर्षी सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज ३१३९, महाबळेश्वर २२२८, कोयना २३४९, नवजा २२०३, सोनाट २३३४, ठोसेघर १९१०, जोर २५२१ बामणोली १७८०, कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे २८७१, दाजीपूर २४३९, गगनबावडा २३१८, जांभूर १७२६, सांगली जिल्ह्यातील धनगरवाडा १६४९, चांदोली १६८१, चरण १३४१, अशी पावसाची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज व कोल्हापूर जिल्ह्यातील निवळे याप्रमुख ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे चांदोली धरण भरले जाते.
बऱ्याचदा बदल हा वॉटर सायकलशी संबंधित असतो, त्याचा अंदाज लावता येत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सरासरी पावसाच्या दुप्पट पाऊस होऊ लागला आहे. ज्या भागाची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ४०० मिलिमीटर आहे, तेथे गेल्यावर्षी अकराशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान विभाग सांगली