CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 08:54 IST2025-10-11T08:53:15+5:302025-10-11T08:54:46+5:30
Yogesh Kadam News: घायवळ प्रकरणी योगेश कदम यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या टीकेला मोठी पोस्ट लिहीत योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिले.

CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
Yogesh Kadam News: कोथरुड गोळीबाराप्रकरणी मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. परंतु, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना क्लीन चिट दिली.
सचिन घायवळला शस्त्र परवाना देता येणार नाही, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितल्यावर गृह राज्यमंत्र्यांनी याबद्दल सुनावणी घेऊन शस्त्र परवान्यासाठी मंजुरी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य होता. पण परवाना दिलेला नाही. यानंतर योगेश कदम यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहून मन मोकळे केले.
माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न
२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काही जण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केले, त्यालाच ताकद देण्याचं काम काही जणांनी केले. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काही जण तेव्हापासूनच करत होते. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसे बघवणार!, असे योगेश कदम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
छोटी मोठी वादळे उठली म्हणून पर्वत हलतो असे नाही
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काही जणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती. असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझे काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसेच निभावत राहणार आहे. शेवटी असेच म्हणावे वाटते की, “छोटी मोठी वादळे उठली म्हणून पर्वत हलतो असे नाही.”, असे योगेश कदम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी…
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) October 10, 2025