अखेर ‘डाकू’ जाळ्यात

By Admin | Updated: September 4, 2014 00:51 IST2014-09-04T00:51:20+5:302014-09-04T00:51:20+5:30

सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

After all, the 'bandit' is in jail | अखेर ‘डाकू’ जाळ्यात

अखेर ‘डाकू’ जाळ्यात

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण : गोंदिया जिल्ह्यातून अटक
वर्धा : सिंदी(रेल्वे) येथील एका सहा वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करणारा दहीन शहा उर्फ डाकू गुलाम शहा याला गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
डाकू हाच मुख्य आरोपी असल्याचा संशय पक्का होताच तीन पोलीस पथके त्याच्या मागावर होती. तो पोलिसांना ठावठिकाणा कळू नये म्हणून पत्ता बदलत होता. पोलीस त्याचे ‘लोकेशन’ घेऊन त्या ठिकाणी पथक पाठवित होते. अशातच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तो अटक झाल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
१९ आॅगस्ट रोजी सिंदी(रेल्वे) येथील एका वस्तीतून चिमुकलीला उचलून गावाबाहेर महिलांच्या गोदरीवर नेले. तिथे तिच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर जखमा करुन तिच्यावर अतिशय क्रूरपणे अतिप्रसंग केला. या प्रकरणी मात्र सिंदी पोलिसांनी तब्बल २० तासांनी गुन्हा दाखल केला. तसेच इमरान शहा मजलीन शहा (२१) याला अटक दाखवून प्रकरणावर पडदा टाकला. चिमुकलीचा पिता आणि आजीने रज्जू आणि संता या दोघांवर संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी त्यांना सोडून दुसऱ्यालाच आरोपी म्हणून अटक केल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली. याप्रकरणी पोलीस कारवाईत पक्षपात होत असल्याची बाबही निर्भिडपणे मांडली. इतकेच नव्हे, या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास व्हावा आणि खऱ्या आरोपींना अटक व्हावी, यासाठी सदर प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले. यामुळे काही महिलांसह विविध संघटनांना रस्त्यावर उतरुन चिमुकलीला न्याय देण्याच्या मागण्या करु लागल्या. अखेर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांना प्रकरणात स्वत: लक्ष घालण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे, तर मनोधैर्य योजनेतून चिमुकलीसाठी साडेतीन लाख रुपये लगेच मंजुर करण्यात आले. अशा घटनेत पीडितेला मनोधैर्य योजनेतून मंजूर झालेले हे महाराष्ट्रातील पहिले प्रकरण असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी दिली. सततच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रकरणाच्या तपासाला पोलीस प्रशासनाने नवी दिशा दिली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्याकडे आला. त्यांनी नव्याने चिमुकली राहात असलेल्या परिसरातील नागरिकांची कसून विचारपूस सुरू केली. दरम्यान, सुमारे दहा जणांची पोलिसांनी झडती घेतली असता सदर चिमुकलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काकाच असल्याचे पुढे आले. यानंतर पोलिसांनी डाकू नावाने कुख्यात असलेल्या तिच्या काकाचा शोध घेणे सुरू केले.
आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते ही बाब लक्षात येताच डाकू आपल्या तीन चिमुकल्या मुलांना वाऱ्यावर सोडून पत्नीला सोबत घेऊन पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी तीन पोलीस पथकेही विविध भागात पाठविण्यात आली. अखेर गोंदिया जिल्ह्यात डाकूला अटक करण्यात पोलिसांना यश आले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: After all, the 'bandit' is in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.