राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात! बडतर्फीचे पहिले पत्र धडकले, कोणाचा नंबर लागला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:25 IST2023-07-03T15:24:22+5:302023-07-03T15:25:20+5:30
Ajit Pawar vs Sharad Pawar News: अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी उपस्थित राहिले होते, त्यांच्या बडतर्फीच्या नोटीसा जारी होऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात! बडतर्फीचे पहिले पत्र धडकले, कोणाचा नंबर लागला?
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना ५ जुलैपर्यंतचे अल्टीमेटम दिल्याचे बोलले जात आहे. या दिवशी राष्ट्रवादीची बैठक शरद पवारांनी बोलावली आहे. त्याचा व्हीपही प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी बजावला आहे. असे असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह ९ मंत्र्यांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांना अपात्र ठरविण्याची याचिका त्यांनी विधान सभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. असे असताना आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी उपस्थित राहिले होते, त्यांच्या बडतर्फीच्या नोटीसा जारी होऊ लागल्या आहेत. खुद्द शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना मी तुमची नेमणूक केली होती, मी तुमच्यावर कारवाई करणार असा इशारा दिला होता. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
बडतर्फ केलेल्या पदाधिकारी, नेत्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाहीय. जयंत पाटील यांच्या नावे हे पत्र आले आहे. '२ जुलै, २०१३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे. पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे… pic.twitter.com/8o0ZNbEao8
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
याचबरोबर अकोला शहर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, नरेंद्र राणे यांना देखील बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या ट्विटवर ही पत्रे पोस्ट केली जात आहेत.