पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:28 IST2025-11-17T11:27:34+5:302025-11-17T11:28:12+5:30
Palghar sadhu murder case: पालघर येथे जमावाने केलेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेवरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आता याच पालघर साधू हत्याकांडात आरोप केलेल्या एका कार्यकर्त्याला भाजपाने पक्षात घेतल्याचं वृत्त समोर आल्यापासून भाजपावर चौफेर टीका होत आहे.

पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाची लाट आल्याने लॉकडाऊन सुरू असताना पालघरमध्ये मुले चोरणारे समजून जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आता याच पालघर साधू हत्याकांडात आरोप केलेल्या एका कार्यकर्त्याला भाजपाने पक्षात घेतल्याचं वृत्त समोर आलं असून, त्यावरून भाजपावर चौफेर टीका होत आहेत. भाजपाच्या समर्थकांकडूनही पक्षाला घरचा आहेर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
पालघर साधू हत्याकांडातील आरोपीच्या कथित पक्षप्रवेशाच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण देताना भाजपा नेते प्रकाश गाडे म्हणाले की,’’काल पासून मॅसेज येत आहेत यावर काय उत्तर देणार? हे खरं आहे का? काल बऱ्याच जणांना यावर रिप्लाय दिला. पण, माहिती घेऊन पोस्ट करणं गरजेचं वाटलं म्हणून पोस्ट करतोय. मला बऱ्याच जणांनी विचारलं की खरं आहे का? बऱ्याच जणांना उत्तर देताना विचार केला की, माहिती घेऊन उत्तर द्यावे किंवा सत्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी, म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये प्रकाश गाडे यांनी लिहिले की, सर्वप्रथम तर पालघर हत्याकांड मी, स्वतः खूप जवळून हाताळलं आहे. पालघर हत्याकांड वरून माझ्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीकडून डिफेमेशन केस फाईल झाली होती. मी, त्या गावातील भाजपचे कार्यकर्त्यांशीदेखील बोललो होतो. त्यामुळं केस ही आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा तेवढाच गंभीर विषय आहे. त्यामुळे या विषयी लिहताना माहिती घेऊन लिहणे गरजेचे आहे.
काल भाजपमध्ये पक्ष प्रवेश झालेले काशिनाथ चौधरी हे तिथले स्थानिक आहेत. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पालघर हत्याकांड प्रकरणात काशिनाथ चौधरी यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही. ह्या प्रकरणात एकूण तीन एफआयआर दाखल आहेत, तलासरी पोलीस स्टेशन, सीआयडी आणि सीबीआय या तिन्ही एफआयआरमध्ये काशिनाथ चौधरी यांचे नाव नाही. त्याच बरोबर कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये देखील काशिनाथ चौधरी यांचं नाव नाही, असे प्रकाश गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, काशिनाथ चौधरी यांना पोलिसांनी जवाब नोंदवून घेण्यासाठी समन्स पाठवलं होतं. कारण घटना घडल्यानंतर सर्व पक्षाचे राजकीय नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या दृष्टीकोनातून त्यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यामुळं काल विविध मीडियाच्या डिजिटल माध्यमांमध्ये पालघर साधू हत्याकांड मधील आरोपी असा उल्लेख केल्यानंतर भाजप समर्थकांच्या पोस्ट आणि उघड उघड नाराजी व्यक्ती केली होती, साहजिकच आहे नाराज होणे. पण, सत्य परिस्थिती वेगळी आहे.. काशिनाथ चौधरी हे पालघर साधू हत्याकांड मध्ये कोणतेही आरोपी नाहीत. कृपया भाजप असं कधीही करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधू हत्याकांडामधील आरोपींना सोडणार नाहीत, आरोपी कोणीही असो कोणताही असो, असेही प्रकाश गाडे यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी तात्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अतिशय दिरंगाईने केली. त्यामुळे त्यांना साधूचा तळतळाट सुद्धा लागली आहे. जे आरोपी आहेत त्यांना देखील शिक्षा होईल आणि होणारच, असा दावाही प्रकाश गाडे यांनी यावेळी केला.