आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 23:32 IST2018-03-04T23:32:57+5:302018-03-04T23:32:57+5:30

अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या...

Accident of MLA Shashikant Shinde's vehicle | आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात

सातारा -  अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकल्याने या अपघातातून आमदार शिंदे थोडक्‍यात बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन रविवारी केले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिंदे उपस्थित राहणार होते. रामेघर येथे जाण्यास त्यांना उशीर झाल्यामुळे त्यांची गाडी वेगाने निघाली होती. 
या मार्गावरील रस्त्याचे काम नुकतेच झालेले आहे. त्यामुळे अजूनही काही प्रमाणात खडीचे लहान तुकडे रस्त्यावर होते. त्यावरून त्यांची गाडी घसरली. गाडीचा वेग जोरात होता. त्यामुळे ती अंधारी फाट्यानजीक असणाऱ्या  एका वळणावरून काही अंतर पुढे गेली. आमदार शिंदे ज्या बाजूला बसले होते, गाडीची तीच बाजू समोर असणाऱ्या एका दरीकडे गेली. मात्र, दरीच्या सुरूवातीलाच असलेल्या दोन झाडांच्या मध्ये जाऊन गाडी अडकली.
आमदार शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून तत्काळ उडी मारली. याच दरम्यान सातारा नगरपालिकेतील भाजपचे गटनेते धनंजय जांभळे तेथे आले. त्यांना ओलांडूनच शिंदे यांची गाडी पुढे आली होती. अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर ते थांबले. त्यांनी तत्काळ खाली उतरुन शिंदे यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना रामेघर येथे सोडले.

Web Title: Accident of MLA Shashikant Shinde's vehicle