Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:48 IST2025-12-06T16:46:30+5:302025-12-06T16:48:02+5:30
Aaditya Thackeray And BJP : आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
नाशिकच्यातपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी सुमारे ११५० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे, ज्यामध्ये तपोवनमधील ५४ एकर महापालिकेच्या जागेचा समावेश आहे. मात्र याच जागेवरील सुमारे १८०० झाडे तोडण्याच्या नोटीसमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? नाशिकवर खरंच प्रेम आहे का? नाशिक महानगरपालिका जर यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे! साधुग्राम आम्हाला हवा आहे. तपोवन आम्हाला हवा आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही!" असं म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
तपोवन...
\— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2025
आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे.
तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम?
एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की… pic.twitter.com/OuOtG4tGNN
"तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम?"
"तपोवन... आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे. तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये... म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल!"
"नाशिकवर खरंच प्रेम आहे का?"
"तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आहे… नाशिकवर खरंच प्रेम आहे का? त्यांच्या सोशल मीडियावर होता! आणि त्याच्या बाजूला बसले होते ते नाशिक भाजपाचे खजिनदार! हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना? नाशिक महानगरपालिका जर यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे! ७०० झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे! साधुग्राम आम्हाला हवा आहे. तपोवन आम्हाला हवा आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही!" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नाशिक महानगरपालिकेने तपोवनमधील सुमारे १७०० हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि काही फांद्यांची छाटणी करण्याबाबत नोटीस काढून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात येताच केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही शेकडोंच्या संख्येने आक्षेप नोंदवला. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ राजकीय वळण घेतलं. राज्यातील प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आवाज उठवला आहे.