अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:26 IST2026-02-27T14:22:04+5:302026-02-27T14:26:37+5:30

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्या आहेत. त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पतीच्या अपघाताबद्दल हा FIR आहे आणि सरकारकडून एफआयआर न घेण्यासाठी दबाव आणला जातोय. हे राजकारण नक्की काय कळत नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले.

A suspicion behind Ajit Pawar plane crash, why is the government afraid of FIR?; Raj Thackeray direct question after meet rohit pawar | अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत FIR का नोंदवला जात नाही?, ३-३ ठिकाणी प्रयत्न करूनही FIR नोंदवण्यासाठी सरकार आडकाठी का आणतंय याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव का आणला जातोय? सरकारी दबावामुळे जर FIR नोंदवला जात नाही तर यामागे काहीतरी काळबेर आहे, सरकार एका FIR ला का घाबरतंय? हे जनतेला सांगावे लागेल असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बारामती विमान अपघातावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवारांनी येऊन मला अपघाताबाबत सगळ्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मला त्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली. त्यांनी ३ ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला. तिन्हीही ठिकाणी सरकारकडून FIR घेतले नाहीत. त्यामुळे इथेच मला संशयाची सुई जाते. पोलिसांनी FIR घेऊ नये असं सरकारला का वाटते? मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला तिथले अधिकारी FIR लिहून घेत होते. तो टाईप करत असतानाच डीसीपी आले आणि FIR लिहून घेऊ नका असं सांगितले, हे कशासाठी? हा निव्वळ अपघात असेल, तो घातपात नसेल किंवा त्यांच्या घरच्यांना जर संशय असेल आणि तपास नीट व्हावा यासाठी FIR हवा असेल तर त्यांना सरकारकडून अडथळे का आणले जातायेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्या आहेत. त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पतीच्या अपघाताबद्दल हा FIR आहे आणि सरकारकडून एफआयआर न घेण्यासाठी दबाव आणला जातोय. हे राजकारण नक्की काय कळत नाही. परंतु FIR करताना जर अडथळे आणले जातात तर यामागे काही काळेबेरे आहे का असा संशय निर्माण होतो. हे सरकारच संशय निर्माण करतेय. FIR व्हावा, चौकशी त्यातून व्हावी अशी मागणी रोहित पवारांची असेल तर त्यात गैर काय? या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि सरकारने त्याची उत्तरे दिली पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, अद्याप ब्लॅक बॉक्सचे पण काही कळले नाही. अपघातात विमानाचे कितीही नुकसान झाले तरी ब्लॅक बॉक्सचं नुकसान होत नसते. सरकार संशयाचं भूत नाचवतंय. माझा साधा प्रश्न आहे, FIR का नोंदवला जात नाही. हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. अजित पवारांसारख्या माणसाच्या अपघाताबाबत आमदार रोहित पवारांचा FIR नोंदवला जात नसेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचे?  हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आपल्यातून एक व्यक्ती गेली आहे. इतका दुर्दैवी अपघात कुणाचाच होऊ नये. जर काही त्रुटी असतील आणि FIR मध्ये त्या गोष्टी मांडायच्या असतील तर मांडू दिला पाहिजे. यातून आपण महाराष्ट्र भलत्या दिशेकडे घेऊन जातोय हे दिसते. सरकारचा दबाव असेल तर अधिकाऱ्यांना दोष का द्यायचा? अधिवेशनात आमदार-खासदारांनी हा प्रश्न मांडला पाहिजे असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

Web Title : अजित पवार के विमान हादसे पर राज ठाकरे ने FIR में देरी पर सवाल उठाए।

Web Summary : राज ठाकरे ने अजित पवार के विमान हादसे में FIR दर्ज न होने पर सवाल उठाया, सरकार पर बाधा डालने का आरोप लगाया। उन्होंने पारदर्शिता का आग्रह किया, जांच और सरकार से जवाबदेही की आवश्यकता पर बल दिया।

Web Title : Raj Thackeray questions delay in FIR for Ajit Pawar's plane crash.

Web Summary : Raj Thackeray questions why FIR isn't filed in Ajit Pawar's plane crash, alleging government obstruction and suspicion. He urges transparency, emphasizing the need for investigation and answers from the government, irrespective of political affiliations.