गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:18 IST2025-07-03T10:17:51+5:302025-07-03T10:18:24+5:30
SpiceJet plane : ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे.

गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीती अद्याप लोकांच्या मनातून गेलेली नसताना स्पाईस जेटच्या विमानाच्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. गोव्याहून पुण्याला येत असलेल्या विमानाच्या खिडकीची फ्रेमच निखळून बाहेर आली होती. यामुळे प्रवाशांच्या काळजात चर्रर्र झाले होते. परंतू, विमान सुखरुप पुणे विमानतळावर उतरले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
विमानाची जी खिडकी असले तिला बाहेरून काच असते. या काचेवर एक होल असतो. जेणेकरून ती काच तडकत नाही. तसेच आतून या खिडकीला फ्रेम असते, त्यात एक पडदा असतो. जो प्रवाशाला प्रकाश नको असेल तर उघडझाप करता येतो. ती जी आतल्याबाजुची फ्रेम असते तीच निखळून बाहेर आली होती. यामुळे विमानाच्या स्ट्रक्चरला कोणता धोका नव्हता. परंतू, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
"स्पाईसजेटच्या Q400 विमानातील एक कॉस्मेटिक विंडो फ्रेम सैल झाली आणि ती निखळलेली आढळली. हा एक नॉन-स्ट्रक्चरल ट्रिम घटक होता, जो प्रकाश रोखण्यासाठी खिडकीवर बसवण्यात येतो. त्यामुळे विमानाची सुरक्षितता किंवा अखंडता कोणत्याही प्रकारे धोक्यात आली नाही," असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे. या प्रवाशाने डीजीसीएला देखील टॅग केले होते.
उड्डाण करताच ९०० फूट खाली आलेले एअर इंडियाचे विमान...
अहमदाबादमध्ये विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं आणखी एक विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली येथून व्हिएन्ना येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या १८७ या विमानाने उड्डाण करताच इशारे देण्यास सुरुवात केली होती. बोईंग ७७७ प्रकारच्या या विमानाने दिल्ली येथून उड्डाण करताच स्टॉल वॉर्निंग, ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टिम ची डोंट सिंक वॉर्निंग कॉकपिटमध्ये मिळू लागली. याचाच अर्थ हे विमान उंचीवरून वेगाने खाली येऊ लागले होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान सुमारे ९०० फुटांपर्यंत खाली आले होते.