कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, सर्व दरवाजे खुले; महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:26 IST2025-07-28T13:24:27+5:302025-07-28T13:26:05+5:30
दरवाजे बंद केलेल्या दिवशीच फुल्ल होणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : तळकोकण, पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस आहे. यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. एकूण ५१९.६० मीटरपैकी रविवारी ५१७.९४ मीटरपर्यंत पाणी साठा झाला आहे. धरणातील पाणी पातळी ओव्हर फ्लोच्या दिशेने सुरू आहे.
मात्र सध्या धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडले आहेत. दरवाजे बंद केलेल्या दिवशीच धरण पूर्ण क्षमतेने भरणार आहे. मात्र महाराष्ट्रातील जलसंधारण विभागाने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा कायम ठेवल्याने अजूनही पाण्याचा विसर्ग १ लाख २० हजार क्युसेक सुरू आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज) आणि घटप्रभा नदीतून (लोळसूर ब्रिज) पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे अलमट्टी धरणात ९२ हजार ७५० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर अलमट्टी पाण्याचा फुगवट्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होते.
म्हणून राज्यातील जलसंधारण विभाग अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एक लाखांवर ठेवण्यासाठीचा दबाव कायम ठेवला आहे. कर्नाटक सरकारही एक लाख २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ठेवला आहे. सध्या उत्तर कर्नाटक, अलमट्टी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस नाही. मात्र महाराष्ट्रातील पाऊस असल्याने अलमट्टीत पाण्याचा आवक वाढली आहे.