प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विषयाची सखोल तयारी करून निर्णय घेणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:49 IST2026-01-29T12:44:44+5:302026-01-29T12:49:02+5:30
Ajit Pawar Death News: अजितदादा आणि माझी पहिली भेट मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना झाली. त्या काळात अजित पवार हे केवळ एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्ह. राज्याच्या राजकारणातही तेव्हा ते फारसे सक्रिय नव्हते. तरीसुद्धा, पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास, प्रश्नांची सखोल जाण आणि काम करून दाखवण्याची तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती.

प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विषयाची सखोल तयारी करून निर्णय घेणारा नेता
- अजित निंबाळकर
(राज्याचे माजी मुख्य सचिव, अध्यक्ष, सारथी)
अजितदादा आणि माझी पहिली भेट मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना झाली. त्या काळात अजित पवार हे केवळ एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्ह. राज्याच्या राजकारणातही तेव्हा ते फारसे सक्रिय नव्हते. तरीसुद्धा, पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास, प्रश्नांची सखोल जाण आणि काम करून दाखवण्याची तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती.
ते राज्यमंत्री झाल्यानंतर आमच्या भेटी व्हायला लागल्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कसा असावा, हे मी त्या काळात जवळून अनुभवले. पुढे मी राज्याचा मुख्य सचिव असताना आमच्या भेटी अधिक सातत्याने होत राहिल्या. प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विषयाची सखोल तयारी करून निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख तेव्हा अधिक ठळक झाली.
जलसंधारणासारख्या तांत्रिक, गुंतागुंतीच्या विषयाचा अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि वेगवान निर्णयक्षमता हे त्यांचे गुण प्रशासनावरची पकड मजबूत ठेवण्यास कारणीभूत ठरले. तेव्हा अजित पवार जलसंधारणमंत्री होते.
मी ‘वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ॲथॉरिटी’चा चेअरमन असताना आमचे कार्यालय ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये होते. ती जागा ‘सीकॉम’च्या मालकीची होती आणि सुरुवातीला ती जागा देण्यास सीकॉम तयार नव्हती. सरकारने मार्केट रेटनुसार ती जागा घेण्याची तयारी दर्शवली, तेव्हा व्यवहाराची रक्कम सुमारे ३५ कोटी रुपये होती. त्यावेळी अजित पवार स्वतः कार्यालयात आले आणि अवघ्या २४ तासांच्या आत सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन त्या निधीची व्यवस्था केली. त्याक्षणी त्यांच्या काम करण्याच्या वेगाचा, निर्णयक्षमतेचा व प्रशासकीय समन्वयाचा मला खरा अंदाज आला. कॅबिनेटमध्ये ते प्रत्येक विषयावर पूर्ण तयारीनिशी आपली बाजू मांडत. कोणतेही काम वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेने पूर्ण व्हावे, यासाठी अत्यंत आग्रही असतात. प्रशासनावर इतकी प्रभावी पकड असलेला नेता मी माझ्या प्रदीर्घ सेवाकाळात फारच क्वचित पाहिला.
‘सारथी’ संस्थेच्या कामात त्यांनी विशेष लक्ष दिले. हे केवळ एका खात्याचे किंवा पक्षाचे काम नसून समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, अशी त्यांची भूमिका होती. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी हे काम स्वतःकडे घेतले. पुण्यात सेनापती बापट रोडवर जागा मिळवण्यापासून ते सारथीची भव्य इमारत उभी राहीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले. मी सारथीचे अध्यक्षपद स्वीकारावे, ही त्यांचीच इच्छा होती. अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हे, तर काम करून दाखवणारे, प्रशासनाला दिशा देणारे नेतृत्व होते. आज हे नेतृत्व आपल्यात नाही, ही राज्याची मोठी हानी आहे.