राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:49 PM2023-11-09T18:49:54+5:302023-11-09T18:51:24+5:30

घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आले.

900 crores given to ST by the state government; Diwali bonus was also announced to the employees | राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर

राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत एसटीला पुढील काळात स्वमालकीच्या बसेस खरेदी करण्यासाठी ९०० कोटी रुपये देण्यास सरकारने संमती दर्शवली. त्याचसोबत दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना बोनसही जाहीर करण्यात आला आहे.

या बैठकीत कोणते निर्णय घेतले?

१) एसटी कर्मचारी व अधिकारी त्यांना सरसकट ६०००/-(सहा हजार रुपये) सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर.

२) खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी २४० दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती.

३) सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी शासन बैठक घेऊन निर्णय घेणार.

४) कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका, जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करून एस टी कर्मचाऱ्यांची रुग्णालयाची बिले महामंडळ देय करणार.

५) घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल.

६) एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी रुपये ९००/- कोटी रुपये देण्यात आले.

७) शिस्त आवेदन पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक केली असून ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेणार.

८) रा. प. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एका महिन्यात रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडे देण्यात येणार.

९) अनुकंपा तत्त्वावरील व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र  कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत ३० दिवसांचे विशेष अभियान राबवून नियुक्ती देणार.

यावेळी परिवहन सचिव जैन, रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नेसो तसेच शिष्टमंडळामध्ये संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी, प्रकाश कांबळे, बापू हराळे, आशिष बाळासराफ, अनुप खैरनार, पद्मश्री राजे इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Web Title: 900 crores given to ST by the state government; Diwali bonus was also announced to the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.