निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:11 PM2019-07-30T20:11:21+5:302019-07-30T20:12:48+5:30

७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते.

54 years to Nimgiri plane crash, 94 people were death |  निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

 निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी 

googlenewsNext

- नितीन ससाणे-  
जुन्नर : सह्याद्रीच्या डोंगररांगांत दुर्गम जंगलात तुफानी पाऊस व वादळवाऱ्यात निमगिरी गावालगत दौंडया डोंगराला धडकून  झालेल्या विमानअपघातात ९४ जणांचा बळी गेला होता. विमानअपघाताच्या या दुर्घटनेला जुलै महिन्यात ५७ वर्षे झाली. अजूनही पावसाळ्यात निमगिरीच्या आदिवासी भागात ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ विमान अपघाताच्या कटू स्मृती जागवतात. ७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन  एअरलाइन्सचे डग्लस डी सी -८:४३ हे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील आदिवासी दुर्गम निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. या भीषण विमान अपघात विमानातील सर्वच्या सर्व ८५ प्रवाशांसह ९  कर्मचारी असे ९४ जण मृत्युमुखी पडले होते. फ्लाईट ए २७ ७१ ही आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि इटलीतील रोमदरम्यान आंतरराष्ट्रीय  शेड्युल्ड पॅसेंजर सेवा होती. डरबीन, सिंगापूर, बँकॉक, मुंबई, कराची यामार्गे हा विमान प्रवास होता. बँकॉकच्या डॉन माँग  आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले हे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळाकडे येत होते. या वेळी मुंबई विमानतळ जवळच्याच अंतरावर आले असताना ३,६०० फूट उंचीवर विमान असताना पावसाळी वातावरणात निमगिरी गावाजवळील डोंगराला धडकून दाट जंगलात चिखलात हे विमान कोसळले होते.

४ रोल्स रॉईस ५०८- १२ कॉनव्हे इंजिन  हे या विमानाने १९६२मध्येच पहिले उड्डाण केले होते. तर, अवघ्या ९६४ तासांचा प्रवास या विमानाने केला होता. सिडनी येथून विमान निघाले तेव्हा ४५ प्रवासी होते, तर डरबीन व सिंगापूर येथे ४० प्रवासी असे एकूण ८५ प्रवासी विमानात  होते. वैमानिक कॅप्टन ल्युगी क्वात्तरीन, सहवैमानिक युगो अरकॅनजील तर फ्लाइट इंजिनिअर ल्युसिनो फोंटाना यांच्यासह ६ कर्मचारी विमानात होते. संध्याकाळी ६.४० वाजता सांताक्रूझ विमानतळावरून विमान औरंगाबाद परिसरात असताना शेवटचा संपर्क झाला होता. कोणता संपर्क नसल्याने विमान डोंगररांगांत किंवा मुंबईजवळच्या  समुद्रात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. निमगिरीजवळ विमानाचे अवशेष सापडल्याने विमानाचा शोध लागला. वैमानिकाची चूक तसेच परिचित हवाई मार्ग नसल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. आदिवासी भागात निमगिरीला जाण्यासाठी कोणताही रस्ता १९६२मध्ये नव्हता.  जवळचे ठिकाण म्हणजे ३० किमी अंतरावरचे तालुक्याचे जुन्नर गाव. या विमान अपघातानंतर मदत कार्यासाठी सैन्यदलाच्या तुकडीला पाचारण करावे लागले होते. पण, कोणीही प्रवासी वा कर्मचारी जिवंत राहिला नसल्याने केवळ मृतदेहांची वाहतूक करण्याचे काम त्यांना करावे लागल. तसेच, विमानाचे अवशेष त्यांनी गोळा केले होते. विमानाचे पडलेले अवशेष, मृत प्रवाशांच्या चीजवस्तू तेथील स्थानिकानी लांबविल्याचे आजही सांगितले जाते. विमान अपघातातील प्रवाशांच्या वस्तू म्हणून नंतर विकण्याच्या, तसेच सापडलेले परकीय चलन नंतर मुंबई येथे वटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसी कारवाईदेखील करण्यात आल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.

***

या विमानातील ऑक्सिजन सिलिंडरपैकी एक सिलिंडर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेची घंटा म्हणून वापरला जात होता. शाळेत सिलिंडर नको म्हणून शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचनेवरून नंतर तो हलविण्यात आला. कॅलिफोर्निया ४.२. येथील झिपऱ्या मिसाईल ऑक्सिजन कंपनी बनविण्यात येणाऱ्या कंपनीचे हे  सिलिंडर होते.

 

Web Title: 54 years to Nimgiri plane crash, 94 people were death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.