Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:12 IST2025-07-05T17:10:51+5:302025-07-05T17:12:13+5:30
MNS Activists Arrested News: मुबंईतील व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
मुबंईतील व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात हिंदी विरुद्ध मराठी वाद सुरू असताना सुशील केडिया यांनी आपण मराठी शिकणार नाही असे म्हटले. मात्र, यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडिया यांचे कार्यलय फोडले. याप्रकरणी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक झाली.
राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर येथील एका व्यापाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेते आणि हिंदी भाषिक लोकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान देत मराठी शिकणार नसल्याचे सांगितले. "राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित बोलता येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला", अशी पोस्ट सुशील केडिया यांनी केली.
Five MNS workers detained in connection with the vandalism at entrepreneur Sushil Kedia's office in Worli: Mumbai Police
— ANI (@ANI) July 5, 2025
मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक
सुशील केडियाची पोस्ट पाहून मनसे कार्यकर्त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सुशील केडिया यांच्या मुंबईतील वरळी येथील सेंच्युरी बाजारजवळील वीवर्क कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मनसेच्या पाच कारकर्त्यांना अटक करण्यात आली.
I request @RajThackeray Ji to consider my humble submission. pic.twitter.com/i8zGszgNtW
— Sushil Kedia (@sushilkedia) July 5, 2025
सुशील केडिया यांनी मागितली माफी
नुकतेच सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून राज ठाकरेंची माफी मागितली. ते म्हणाले की, मी केलेले ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिले गेले होते. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. परंतु, मराठी बोलता न येणाऱ्या लोकांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावात होतो. मला असे वाटत आहे की, मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी."