१ जूनपासून एसटी महागणार

By Admin | Updated: May 31, 2014 05:18 IST2014-05-31T05:18:13+5:302014-05-31T05:18:13+5:30

राज्य शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार डिझेल दर आणि महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे एसटीच्या प्रवास भाड्यात २.४८ टक्क्यांची वाढ करण्यात आली

From 1st June, ST will be costlier | १ जूनपासून एसटी महागणार

१ जूनपासून एसटी महागणार

मुंबई : राज्य शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार डिझेल दर आणि महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे एसटीच्या प्रवास भाड्यात २.४८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ १ जूनपासून लागू होणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. साध्या आणि जलद सेवेमध्ये प्रति किलोमीटर २.५ पैसे तर रात्र आणि निमआराम सेवेत प्रति किलोमीटर अनुक्रमे ३.३३ आणि ४.१६ पैसे अशी अत्यल्प वाढ होईल. एसी बसचे भाडे हे १0 ते १७ रुपयांपर्यंत वाढणार असून, निमआराम बसच्या भाड्यात चार रुपयांपेक्षा जास्त भाडेवाढ झाली आहे. साध्या आणि जलद सेवेच्या पहिल्या १२ किलोमीटरच्या प्रवासात वाढ करण्यात आली नसून, १३ ते ४२ किलोमीटरसाठी १ रुपया, ४३ ते ५४ किलोमीटर प्रवासासाठी २ रुपये, अशी अल्प वाढ करण्यात आली आहे. साध्या बससेवेच्या प्रवास भाड्यात मुंबई ते रत्नागिरी ९ रुपयांनी, मुंबई ते औरंगाबाद तसेच पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूरच्या प्रवास भाड्यात प्रत्येकी १0 रुपयांनी वाढ झाली आहे. यात नागपूर ते पुणे प्रवास १९ रुपयांनी वाढला आहे. निमआराम (हिरकणी) बससेवेचे मुंबई ते रत्नागिरीचे भाडे १७ रुपयांनी, मुंबई ते औरंगाबाद आणि पंढरपूरचे भाडे हे प्रत्येक १६, मुंबई ते कोल्हापूरचे भाडे १६ रुपयांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे नागपूर ते पुणे या निमआराम सेवेच्या भाड्यात २९ रुपयांची वाढ आहे. एसी बस भाड्यातही वाढ करण्यात आली असून, दादर ते पुणे आणि ठाणे ते स्वारगेट या शिवनेरी एसी प्रवासाचे भाडे प्रत्येकी १० रुपयांनी वाढले आहे. तर पुणे ते औरंगाबाद तसेच पुणे रेल्वे स्टेशन ते कोल्हापूर आणि पुणे रेल्वे स्टेशन ते सांगलीच्या प्रवास भाड्यात प्रत्येकी १७ रुपयांनी वाढ झाली आहे.

Web Title: From 1st June, ST will be costlier