मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:32 IST2025-09-11T10:31:24+5:302025-09-11T10:32:39+5:30
ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतून नेपाळमध्येपर्यटनासाठी गेलेले १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमध्ये उद्भवलेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील ९७७-९८० ८६० २८८१ आणि ९७७-९८१ ०३२ ६१३४ हे दोन मोबाइल क्रमांक तर राज्यातील ९१- ९३२१५८७१४३ आणि ९१-८६५७११२३३३ हे दोन मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले असून या क्रमांकांवर व्हॉट्सअॅप कॉलही लावता येईल.
पर्यटकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य
नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
पर्यटनाला फटका, ५०० पर्यटकांनी केला नेपाळ दौरा रद्द
कोल्हापुरातून नेपाळसाठी प्रत्येक वर्षी हजारांहून अधिक पर्यटक जातात. नेपाळमधील सुंदर मंदिरे, स्वच्छता अन् एकूणच तेथील संस्कृतीची भुरळ उभ्या देशाला आहे. नेपाळचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी हजारांच्या वर पर्यटक नेपाळला जातात. मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेपाळ सहलीवर जाणाऱ्या कोल्हापुरातील ५०० हून अधिक इच्छुक पर्यटकांनी नेपाळ दौरा रद्द केला आहे.
नेपाळमधील उद्रेक पाहून पर्यटकांनी टूरिस्ट कंपन्यांना मेल पाठवून बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, टूरिस्ट कंपन्यांनी विमानांचे तिकीट आधीच बुक केल्याने ते तिकीट रद्द करण्यास विमान कंपन्या तयार नाहीत. आम्ही सेवा द्यायला तयार आहोत, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतल्याने टूरिस्ट कंपन्यांचीही गोची झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० पर्यटकांनी त्यांचा नियोजित नेपाळ दौरा रद्द केला आहे . यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असे कोल्हापूर जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले.