नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:49 IST2025-11-24T16:44:22+5:302025-11-24T16:49:53+5:30
Maharashtra Local Body Election 2025: अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बरेच नगरपरिषद सदस्य बिनविरोध निवडून आले.

नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांवरून विरोधक महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीवर टीका करत आहेत. निवडणुकीआधीच भाजपाच्या १०० नगरपरिषद सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बरेच नगरपरिषद सदस्य बिनविरोध निवडून आले.
रविंद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार, बिनविरोध निवडून आलेले ४ नगरपरिषद सदस्य कोकण विभागातून, ४९ उत्तर महाराष्ट्रातून, ४१ पश्चिम महाराष्ट्रातून, तर मराठवाडा आणि विदर्भ विभागातून प्रत्येकी तीन नगरसेवक आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर होणार आहेत.
विरोधकांच्या उमेदवारांना धमकावत आहेत
भाजपाने उघडपणे सत्तेचा गैरवापर केला. त्यांनी बिहारमध्ये ‘जंगलराज’ हा शब्द वापरला, पण इथे ते विरोधकांच्या उमेदवारांना धमकावत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या जाहीर भाषणातून आम्हाला मदत करा, विकास निधी देऊ, असे सांगत असल्याचा आरोप करत ही सौदेबाजी असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ला वाटते ही सौदेबाजी किंवा धमकी आहे. निधी हा अजित पवार यांच्या घरचा नाही. निधी करातून येतो, घरातून नाही, अशी टीका दानवे यांनी केली.
भाजपावरील सर्व आरोप निराधार
भाजपा लोकशाही आणि निवडणूक यंत्रणेवर विश्वास ठेवतो आणि त्याचे कठोरपणे पालन करतो. बिनविरोध निवडणूक ही केवळ भाजपा नेतृत्वावरील लोकांचा विश्वास आणि पक्षाच्या विकासकामांवरील लोकांचा विश्वास दर्शवते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. विरोधकांनी भाजपावर घराणेशाहीचे राजकारण वाढवल्याचाही आरोप केला आहे.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की, संपूर्ण राज्याचा विकास आम्हाला करायचा आहे. सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेकवेळा भाषणात काही गोष्टी आपण बोलतो. त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी किंवा कोणी असे बोलले असले, तरी त्यांचा उद्देश तसा नाही. तेही असा भेदभाव कधी करणार नाहीत. निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. त्यानंतर महाराष्ट्राचा, नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.