'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:25 IST2023-08-22T18:24:48+5:302023-08-22T18:25:30+5:30
Madhya Pradesh Election: 'भाजपवाले म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काय केले? काँग्रेसने संविधान वाचवले, लोकशाही वाचवली.'

'भाजपने ED ची भीती दाखवून सरकार स्थापन केले, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात
Madhya Pradesh Election 2023: लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. या महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकी होणार आहेत, त्यामुळे नेत्यांचे दौरेही राज्यात वाढले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील सागरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.
'आम्ही 70 वर्षे संविधान वाचवले '
भाजपवर ताशेरे ओढत खर्गे म्हणाले, 'काँग्रेसने 70 वर्षात काय केले, हे भाजप नेहमी विचारते. आम्ही संविधान वाचवले, लोकशाही वाचवली. त्यामुळेच ते (नरेंद्र मोदी) पंतप्रधान झाले. तुम्ही ईडीचा धाक दाखवला आणि राज्यात तुमचे सरकार स्थापना केले. कर्नाटक आणि मणिपूरमध्येही असेच केले गेले. जिथे भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, तिथे ते हेच काम करतात. संविधान बदलाचे प्रयत्न सुरू आहे, पण असे होणार नाही. 140 कोटी जनता तुमच्यासमोर उभी असेल,' अशी टीका खर्गेंनी यावेळी केली.
'मध्य प्रदेश सरकार बेकायदेशीर'
खर्गे पुढे म्हणाले की, 'मध्य प्रदेशातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. भाजपने आमचे आमदार फोडले. काँग्रेसने स्वतःच्या तत्त्वांवर सरकार स्थापन केले आहे. मी वचन देतो की काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. स्वयंपाकाचा घरगुती गॅस 500 रुपयांना मिळेल. महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल. 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. याशिवाय राज्यात जातीय जनगणनाही करुन दिली जाईल,' अशी आश्वासने खर्गेंनी यावेळी दिली.
निवडणुकीत भाजपला संत रविदासांची आठवण येते
'नरेंद्र मोदींनी सागर येथे पूज्य संत रविदास यांच्या 100 कोटी रुपयांच्या अनुसूचित जातींच्या मंदिराची पायाभरणी केली, परंतु दिल्लीत मूर्तीची मोडतोड करण्यात आली. भाजपला संत रविदासांची फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवण येते. मोदीजी गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहेत, तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान गेली 18 वर्षे राज्यावर राज्य करत आहेत. यांना फक्त निवडणुकीच्या वेळीच रविदासांची आठवण झाली,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.