न्यूनगंड अन् सोशल फोबिया; ओळखायचं कसं आणि काय करायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:38 IST2025-04-13T11:36:19+5:302025-04-13T11:38:46+5:30

social phobia: सोशल फोबिया कसा निर्माण होतो, त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? जाणून घ्या सविस्तर...

Inferiority complex and social phobia; how to recognize it and what to do? | न्यूनगंड अन् सोशल फोबिया; ओळखायचं कसं आणि काय करायचं?

न्यूनगंड अन् सोशल फोबिया; ओळखायचं कसं आणि काय करायचं?

-डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ
मीर येऊन भेटला. त्याच्याशी बोलताना जाणवलं, याला लहानपणापासून न्यूनगंड व सोशल फोबिया आहे.. आमची काही सेशन्स झाली. त्याची आत्मप्रतिमा खूप दुबळी होती. त्याच्या रंगाविषयी, उंचीविषयी त्याला गंड होता. शाळेत, महाविद्यालयात, मुलांच्या चिडवण्यामधून तो आणखी पक्का झाला होता. 

लहानपणच्या दुबळ्या आर्थिक परिस्थितीमुळे, लोकांच्या टोमण्यांमुळे ही तो दुखावला गेला होता. आपल्याला बोलण्याची कला अवगत नाही. चार लोकांत बोललो तर आपलं हसंच होईल हा समज घट्ट झाला होता. असे आणखी बरेच गंड त्याच्या मनात रुतून बसले होते. मी त्याला काही स्वस्थतेची सेशन्स दिली.  काही मनाचे व्यायाम शिकविले आणि काही महत्वाच्या टिप्स दिल्या. त्या अशा : 

१. या जगात प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. तसाच तूही आहेस. प्रतिकूल परिस्थितीतून शिकून तू नोकरी मिळविली आहेस. बुद्धिमत्ता व कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत.  

२. या जगात प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. वेगळी आहे. आपण सर्व निसर्गनिर्मित आहोत. मग ती निर्मिती असुंदर कशी असू शकेल?  रंग, उंची वगैरे परिमाणं मानवनिर्मित आहेत. दिसण्यापेक्षा तुझं असणं म्हणजेच तुझी देहबोली, तुझं वागणं, तुझा वावर, आत्मविश्वास, बोलताना वापरली जाणारी सुसंस्कृत भाषा, चेहेऱ्यावरचं स्मित जास्त महत्त्वाचं आहे.

३. आपण जसे आहोत तसेच्या तसे स्वत:ला स्वीकारणं महत्त्वाचं आहे.

४. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णयक्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता इत्यादी व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी विकसित करता येतात यावर विश्वास ठेव. त्यासाठी स्वत:त बदल घडणं आवश्यक आहे, 

५.  माणसं आहेत तिथे मतभेद, संघर्ष, इर्षा, स्पर्धा, थोडंफार राजकारण असणारच. त्यानं मी अस्वस्थ होणार नाही. त्यासाठी कामाच्या ठिकाणी करायची स्वस्थतेची तंत्रे, स्वयंसूचना शिकून घेता येतात.

६. माझ्यासमोर असणारी लोकांची संख्या, त्यांची अधिकार पदामुळे असणारी श्रेणी या गोष्टीचं दडपण यायचं काहीच कारण नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ व महत्त्वाचा असतो. मीही माझ्या ठिकाणी महत्त्वाचा आहेच. माझ्या अंगी नम्रता असावी पण नेभळटपणा किंवा पळून जाण्याची वृत्ती नसावी. 

हे सगळं साधण्यासाठी, गर्दीची भीती घालवण्यासाठी कल्पना शक्ती वापरून करावयाच्या गायडेड इमेजरीच्या  तंत्रांचा सरावही उपयुक्त आहे.  आज या गोष्टीला सात आठ महिने झाले. समीरमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्यानेही मनापासून कष्ट घेतले आणि आता दैनंदिन रुटीनमधल्या मीटिंग्ज, कस्टमर मीटपासून प्रेझेंटेशनपर्यंत  सगळ्याच गोष्टी विलक्षण आत्मविश्वासाने तो करू लागला.

असे जाणवू शकतात सोशल फोबिया  

- नवीन व्यक्तींना भेटताना

- अधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तींशी बोलताना 

- विद्यार्थ्यांच्या बाबतीत, वर्गात उठून काही बोलायच्या वेळी

- ऑफिसमध्ये  सादरीकरण करताना 

- सभेत किंवा मिटिंगमध्ये बोलताना 

- सामाजिक कार्यक्रमात सहभागी होताना 

- सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना 

- सार्वजनिक ठिकाणी जेवताना, खाता पिताना 

- स्टेजवरून बोलताना किंवा भाषण करताना  

- गर्दीच्या ठिकाणी वावरताना इ.

- या भीतीमधील शारीरिक लक्षणे

- चेहरा मलूल दिसणे

- श्वासोच्छ्वास जोरात होणे, पोटात खड्डा पडणे 

- हात कापणे, आवाज कापणे, छातीत धडधडणे किंवा जड वाटू लागणे

- तळव्यांना घाम येणे, चक्कर येणे

Web Title: Inferiority complex and social phobia; how to recognize it and what to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.