युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:23 IST2021-08-24T19:23:21+5:302021-08-24T19:23:29+5:30
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी एफआयआर दाखल केली आहे.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल
मुंबई:भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी आज शिवसेना युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वरुण सरदेसाई यांच्यावर मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या विविध आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी भाजप कार्यालयाची तोडफोड आणि भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आंदोलनावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.
भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी एका निवेदनात म्हटलं की, पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. आता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या वरुण सरदेसाईंविरोधातही एफआयआर दाखल करावा. तसेच, वरुण सरदेसाई यांच्यावर कारवाई न केल्यास भाजयुमोनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नेमकं काय झालं ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणेंनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यात शिवसेनेनं थेट नारायण राणेंच्या घराबाहेर आंदोलन केल्यानं संघर्ष आणखी वाढला. युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येनं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राणे यांच्या घराबाहेर भाजपाचे कार्यकर्तेही होते. तेव्हा दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. राणे यांच्या घराबाहेर पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढवला. परंतु यावेळी झालेल्या झटापटीत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले.