तीन सराईत गुन्हेगारांना दणका; लातूरसह तीन जिल्ह्यामधील आठ तालुक्यातून हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:46 IST2026-01-14T16:45:46+5:302026-01-14T16:46:32+5:30
लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यात वास्तव्याला बंदी

तीन सराईत गुन्हेगारांना दणका; लातूरसह तीन जिल्ह्यामधील आठ तालुक्यातून हद्दपार
लातूर : सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या टोळ्यांविराेधात कडक पावले उचलत हद्दपारीची कारवाई केली आहे. समाजात सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून, दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तिघांना महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१च्या कलम ५५ अनुसार लातूर जिल्ह्यासह लगतच्या नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
पाेलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. हद्दपार केलेल्या आरोपीमध्ये ईश्वर गजेंद्र कांबळे (२३, रा. जय नगर, लातूर), विकास ऊर्फ विक्की गजेंद्र कांबळे (२५, रा. जय नगर, लातूर) आणि प्रफुल श्रीमंत गायकवाड (२९, रा. सिद्धार्थ सोसायटी, लातूर) यांचा समावेश आहे.
टाेळीतील गुन्हेगारांविराेधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
काेरवाई करण्यात आलेल्या तिघांही आरोपींविराेधात लातूर येथील विवेकानंद चौक ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवत लूटमार, धमकी देणे आदींसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीने परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. यामुळे सामान्य नागरिक त्यांच्या विरोधात उघडपणे तक्रार देण्यास घाबरत होते. यापूर्वी त्यांच्याविराेधात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या हाेत्या. मात्र त्यांच्या वर्तनामध्ये कुठलीही सुधारणा न होता गुन्हेगारी वाढतच गेली.
या तालुक्यातून करण्यात आले हद्दपार
टोळीला दोन वर्षांसाठी लातूरसह लगतच्या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले असून, यामध्ये संपूर्ण लातूर जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील लाेहा, मुखेड, देगलूर, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, उमरगा, कळंब आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यांचा समावेश आहे. यासाठी विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी प्रस्ताव तयार करून पाठपुरावा केला.