चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 03:43 IST2025-07-05T03:43:29+5:302025-07-05T03:43:46+5:30
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थागुशाच्या पथकाची कारवाई

चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला!
लातूर : वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारा हायवा टिप्पर स्थागुशाच्या पथकाने रात्री उशिरा पकडला असून, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थागुशाच्या पथकाने अहमदपूर हद्दीत केली असून, एकाला अटक केली. याबाबत दाेघांविराेधात अहमदपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविराेधात जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून रात्री उशिरा अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मार्गावर पाेलिसांनी सापळा लावला. वाळूची अवैध मार्गाने चोरटी वाहतूक करीत असलेला हायवा टिप्पर पकडण्यात आला. यावेळी २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी टिप्परसह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात पिराजी समृत हाके (वय ३२, रा. हुलेवाडी पो. सावरगाव, ता. लोहा जि. नांदेड), विकास काशिनाथ क्षीरसागर (रा. आडगाव, ता. लोहा जि. नांदेड) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, पिराजी हाके याला अटक केली आहे.
ही कारवाई लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलिस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, सचिन धारेकर, मनोज खोसे, चंद्रकांत डांगे यांनी केली आहे.
खबऱ्याच्या माहितीनंतर पथकाने रचला सापळा...
अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले. त्यानंतर माहिती संकलित करताना खबऱ्याने टीप दिली. याच्या आधारे पोलिस पथकाने अहमदपूर हद्दीत सापळा रचला. चोरट्या मार्गाने अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिप्पर पोलिस पथकाने ताब्यात घेतला. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये वाळू असल्याचे आढळून आले. यावेळी टिप्परसह एकास ताब्यात घेतले आहे. अहमदपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.