पैसा झाला खाेटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:42+5:302021-09-22T04:23:42+5:30

या नाण्याच्या नशिबी वनवासच... १० रुपयांचे नाणे काही वर्षे बाजारपठेत, व्यवहारात चालले. मात्र, अचानक काेठून तरी काेणीतरी अफवा, ...

The money is gone; Ten rupee coin does not work! | पैसा झाला खाेटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !

पैसा झाला खाेटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !

या नाण्याच्या नशिबी वनवासच...

१० रुपयांचे नाणे काही वर्षे बाजारपठेत, व्यवहारात चालले. मात्र, अचानक काेठून तरी काेणीतरी अफवा, चुकीची माहिती पसरवली आणि या नाण्याला अडगळीला पडण्याची वेळ आली. यातून मग व्यापारी, ग्राहक हे नाणे स्वीकारण्याबाबत फारसे पुढे यायला तयार नाहीत. छाेट्या व्यापाऱ्यांनी तर हे नाणे घेणेच बंद केले आहे. मग ग्राहकांनी एकापाठाेपाठ हे नाणे काेणी घेतच नाही, असा सूर आवळला. यातूनच १० रुपयांच्या नाण्याच्या नशिबी वनवास आला आहे.

नाण्यात अडकले लाखाे रुपये...

बहुतांशवेळा या नाण्याच्या देवाण-घेवाणीवरून व्यापारी-ग्राहकांत वादाचे प्रकार घडत आहेत. या नाण्याचा वापर व्यवहारात हाेण्याची गरज आहे. त्यासाठी आता सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जे काेणी हे नाणे स्वीकारणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. परिणामी, या नाण्यामध्ये लाखाे रुपये अडकले आहेत.

पैसे असून अडचण

दहा रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नाही. याबाबत केवळ चुकीचे समज-गैरसमज अधिक आहेत. एखाद्याने हे नाणे घेण्याचे टाळले तर दुसराही ताे स्वीकारण्याबाबत टाळाटाळ करताे. आम्हाला काही अडचण नाही, पण पुढे ग्राहकत हे नाणे स्वीकारत नाही. अशावेळी आमचीही अडचण हाेते, असे एका व्यापाऱ्याने सांगितले. याबाबत अनेकदा संबंधित यंत्रणेने खुलासा केला आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही.

- पवन जाधव, लातूर

महामंडळाच्या बसमध्ये, बँकामध्ये हे दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जाते. मात्र, बाजारपेठेत हे नाणे स्वीकारण्याबाबत व्यापारी, ग्राहकांची फारच उदासीनता आहे. याबाबत ठाेस कारण विचारले असता, काेणीही घेण्यासाठी तयार नाही, मग आम्ही कशासाठी घ्यायचे...असा सवाल उपस्थित केला जात आहे. यातून पैसे असून अडचण...अशी अवस्था आहे. - सतीश गायकवाड, उदगीर

बँकांमध्येही नाण्यांचा माेठ्या प्रमाणात साठा...

कुठल्याही नाण्यांवर प्रत्यक्ष बंदी नाही. मात्र, याबाबत पसरविण्यात आलेल्या अफवांचा दहा रुपयांच्या नाण्याला माेठा फटका बसला आहे. अशावेळी बँकांतून ग्राहक हे नाणे स्वीकारण्याबाबत पुढे येत नाहीत. यातून माेठ्या प्रमाणावर बँकामध्ये नाण्यांचा माेठा साठा पडून आहे. रिझर्व्ह बॅकेने अधिकृत केलेले काेणतेही नाणे काेणीही नाकारणे, हा गुन्हा आहे. अशा व्यक्ती, संस्थाच्याविराेधात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. बँकेच्या व्यवहारात ग्राहकांकडून अशी नाणी स्वीकारली जातात. बँकांकडून याबाबत कुठलीही आठकाठी नाही. मात्र, ग्राहकांकडून स्वीकारण्याबाबत नकार दिला जात आहे.

Web Title: The money is gone; Ten rupee coin does not work!