Maharashtra CM Confusion in ncp congress workers in latur | Maharashtra CM : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांसमोर धर्मसंकट
Maharashtra CM : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांसमोर धर्मसंकट

लातूर - राज्यातील सत्ता नाट्यात अजित पवार यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील राजभवनावर उपस्थित होते. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला पक्षाचे समर्थन नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे आता कोणासोबत राहायचे हे मोठे धर्मसंकट राष्ट्रवादी विजयी उमेदवारांसमोर उभे राहिले आहे.

अशीच अवस्था उदगीर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संजय बनसोडे यांची आहे. बनसोडे मुंबईच्या दिशेने असून त्यांनाही राजकीय दिशा कोणती निवडावी असा प्रश्न पडला असणार. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला, परंतु आता काय निर्णय करावा, नेमके काय बोलावे, याची घालमेल दिसत होती.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते पुन्हा अधिक सक्रिय झाले आहेत. पक्षादेशानुसार रविवारी दुपारी 3 वाजता भाजपाची बैठक होणार आहे त्यासाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. अत्यंत वेगाने घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे भाजपाचे नेते व आमदार आपापल्या मतदार संघात थांबून होते. मात्र अचानकपणे शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ झाल्याने भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यामुळे मनपातील नाट्यमय बदलानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लातुरात थांबलेले माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी सायंकाळी मुंबईला निघणार आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे मुंबईत पोहचले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बदलून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं. 

 

Web Title: Maharashtra CM Confusion in ncp congress workers in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.