Latur: घरून यात्रेला गेले, पण परतली ती केवळ पार्थिवं! कारच्या धडकेत गंगाखेडचे तीन तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:04 IST2026-01-09T13:03:52+5:302026-01-09T13:04:30+5:30
किनगावची यात्रा करून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप

Latur: घरून यात्रेला गेले, पण परतली ती केवळ पार्थिवं! कारच्या धडकेत गंगाखेडचे तीन तरुण ठार
अंधाेरी/ किनगाव (जि. लातूर) : किनगाव येथील यात्राकरुन गावाकडे परतणाऱ्या मोटारसायकलस्वारास भरधाव वेगातील कारने उडविले. त्यात दुचाकीवरील तिघे ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास किनगाव- अंबाजोगाई मार्गावरील आनंदवाडी पाटीजवळ घडली. मयत हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत.
संदीप बिभिषण चाटे (३२), खुशाल उर्फ विठ्ठल व्यंकटराव चाटे (४०) व अजय चंद्रकांत दराडे (सर्वजण रा. आनंदवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी मयत तिघांची नावे आहेत. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे यात्रा सुरु आहे. यात्रेसाठी गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील संदीप चाटे, खुशाल उर्फ विठ्ठल चाटे आणि अजय दराडे हे आले होते. यात्रा करुन ते गुरुवारी रात्री दुचाकी (एमएच २४, बीई २९४०) वरुन गावाकडे परतत होते. ते आनंदवाडी पाटीजवळ पोहोचत असताना अंबाजोगाईकडून किनगावकडे येणाऱ्या भरधाव वेगातील कार (एमएच ४६, एडी ५८५४) ने दुचाकीस जोराची धडक दिली. या भीषण अपघातात संदीप चाटे व खुशाल उर्फ विठ्ठल चाटे या दोघा चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय दराडे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले असता शुक्रवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास मृत्यू झाला.
या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ संजय चाटे यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलिसांत कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक माणिकराव डोके हे करीत आहेत.