लातूर हादरले! नवोदय विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:28 IST2026-01-05T13:26:30+5:302026-01-05T13:28:41+5:30
कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला.

लातूर हादरले! नवोदय विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश
लातूर : येथील जवाहर नवाेदय विद्यालयात सातवीमधील अनुष्का किरणकुमार पाटाेळे (वय १२, रा. टाका ता. औसा) या विद्यार्थिनीने वसतिगृहात टाॅवेलने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता समाेर आली. कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला.
नातेवाइकांच्या आक्राेशाने दिवसभर रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण हाेते. रात्र झाल्याने मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले नाही. कुटुंबीयांनीही त्याला विराेध दर्शवत जाेपर्यंत गुन्हा दाखल हाेत नाही, ताेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशीही भूमिका संतप्त कुटुंबीयांनी घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही नाेंद झाली, नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.
दाेन कर्मचारी, १८ विद्यार्थिनी
विद्यार्थिनी अनुष्काने जिथे गळफास घेतला त्या हाॅलमध्ये दाेन महिला कर्मचारी आणि १८ विद्यार्थिनी हाेत्या. काेणालाच कसे काय दिसले नाही? असा सवाल अनुष्काचे वडील किरणकुमार पाटाेळे यांनी केला आहे; तसेच गावातील शिक्षक सुधाकर लाेहकरे म्हणाले, अनुष्का ही हुशार विद्यार्थिनी हाेती. तिच्यावरील अन्याय प्रशासनाने दूर केला पाहिजे. रवी पाटील यांनी शाळेतील दाेषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.
पालकांचा आक्षेप आणि आक्राेश
रुग्णालयाच्या परिसरात आक्राेश करणारे आई-वडील म्हणाले, ‘सकाळी नऊ वाजता आम्हाला शाळेतून फाेन आला. तुम्ही तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात या. काय झाले आहे, ते सांगितले नाही. लपवाछपवी केली. आम्हाला मृतदेहही दाखविला नाही. बसलेल्या स्थितीत गळफास कसा काय बसताे?’ असा आईचा सवाल हाेता. दरम्यान, शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी गर्दी केली हाेती. दिवसभर आक्राेश सुरू हाेता.
जिल्हा प्रशासन शाळेत
घटनेची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कळल्यानंतर उपविभागीय अधिकारी राेहिणी नऱ्हे, तहसीलदार साैदागर तांदळे नवाेदय विद्यालयात पाेहोचले. घटनेची कसून चाैकशी केली जावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी नवाेदयमध्ये शिकतात. त्यामुळे घटनेच्या मुळाशी जाऊन अनुष्काला न्याय मिळवून देणे, वस्तुस्थिती समाेर आणण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
गतवर्षीच मिळाला हाेता अनुष्काला प्रवेश
टाका गावात इयत्ता पाचवीपर्यंत अनुष्काचे शिक्षण झाले. जवाहर नवाेदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी तिला प्रवेश मिळाला. अभ्यासात हुशार असलेल्या अनुष्काला शाळेतील शिक्षकांनी नवाेदय परीक्षेसाठी प्राेत्साहित केले.
शुक्रवारी आईला केला शेवटचा काॅल
अनुष्काने शेवटचा काॅल शुक्रवार, २ जानेवारी राेजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केला हाेता. तिने आईशी पाच मिनिटे संवाद साधला. ती हसून बाेलल्याचे आईने सांगितले.
अनुष्का म्हणाली, ‘मम्मी शेंगदाण्याचे लाडू घेऊन ये.’
अनुष्काने काॅल केल्यानंतर आईला म्हणाली, ‘मम्मी, तू आणि आंटी मला शेंगदाण्याचे लाडू, बिस्कीट पुडे घेऊन ये. मी लग्नाला येते; मात्र माझी परीक्षा आहे. लग्न लावून लागलीच परत जाणार आहे.’