लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:38 IST2025-10-07T16:38:03+5:302025-10-07T16:38:36+5:30
बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकच्या चाकाखाली चिरडली; औसा महामार्गावर हृदयद्रावक अपघात

लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली
- महेबूब बक्षी
औसा (लातूर): औसा-लातूर महामार्गावर मंगळवारी (दि. ७) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघोली (ता. औसा) येथून बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी आणि काही खरेदीसाठी दुचाकीवरून आलेल्या या भावंडांना भरधाव बलोरो कार आणि ट्रकच्या अपघाताने चिरडले. अपघातानंतर दोन्ही वाहने फरार झाली असून, वाघोली गावावर शोककळा पसरली आहे.
प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) आणि त्याची लहान बहीण गायत्री पद्माकर शिंदे (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत. प्रसाद हा बहिण गायत्रीला (दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी) लातूर येथील कॉलेजला सोडण्यासाठी आणि औशातून खरेदी करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून (एम एच २४ बी ०६५३) येत होता. औसा-लातूर महामार्गावरील एका साडीच्या दुकानाजवळ, प्रसाद आपल्या लेनमधून सरळ जात असताना, पाठीमागून भरधाव आलेल्या बलोरो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर खाली कोसळले आणि त्याच वेळी बाजूने वेगाने जाणाऱ्या एका ट्रकच्या चाकाखाली आले. अपघाताची भीषणता इतकी होती की, दोघांच्याही डोक्याचा आणि छातीपासून वरील भागाचा चेंदामेंदा झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आई-वडिलांचा हंबरडा आणि शोकाकुल गाव
शेतकरी पद्माकर शिंदे यांच्या कुटुंबात प्रसाद आणि गायत्री अशी दोनच मुले होती. १२ वी पर्यंत शिकलेला प्रसाद वडिलांना दुध व्यवसायात मदत करत असे, तसेच लहान बहिणीला लातूरला शिकवत होता. मनमिळाऊ स्वभाव आणि शिक्षणाची गोडी असलेली गायत्री फॅशन डिझायनरच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. एकाच वेळी दोन पोटची मुले अपघातात गमावल्याचे पाहून आई-वडिलांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा भाऊ शेवटपर्यंत तिच्यासोबतच राहिला. वाघोली गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात या दुर्दैवी घटनेने अश्रू अनावर झाले होते.
पोलिसांकडून वाहनांचा शोध सुरू
अपघातानंतर बलोरो कार आणि ट्रकचालक दोन्ही वाहने घेऊन तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील खासगी दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, अपघातात कारची समोरील बाजू आत गेल्याचे, तर ट्रक वेगाने जाताना कैद झाले आहे. औसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही भावंडांवर वाघोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दोन्ही फरार वाहनांचा कसून शोध घेत आहेत.
महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीचा बळी
औसा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्गांची वाहतूक होते. शहरातून जाणाऱ्या या मार्गाला सर्व्हिस रोड नसतानाही, हॉटेल, दुकानदार आणि व्यापाऱ्यांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. यामुळे अवजड आणि भरधाव वाहनांना अडथळा होतो. महामार्ग वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महामार्गावरील वाहतुकीची शिस्त पूर्णपणे बिघडली आहे, ज्यामुळे निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे.