- राजकुमार जाेंधळे
लातूर - जिल्हा पोलिस दलाच्या वेतन वितरण प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या आर्थिक अनियमिततेप्रकरणी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, चार जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, मे २०१५ ते मार्च २०२५ या प्रदीर्घ कालावधीत हा अपहार सुरू होता. आरोपींनी संगनमत करून शासनाच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने वेतन अभिलेखांमध्ये मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. बनावट दस्तऐवज तयार करून त्याचा गैरवापर करण्यात आला. प्रामुख्याने प्रोत्साहन भत्ता, मूळ वेतन थकबाकी, विशेष वेतन आणि इतर वेतन शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम काढली जात असे. अखेर दहा वर्षांनंतर करण्यात आलेल्या चाैकशीतून हा घाेटाळा समाेर आला. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास लातूर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे हे करीत आहेत. पोलिस दलातील घाेटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आराेपींची अशी ‘मोडस’ ऑपरेंडी...
चाैघा आरोपींनी शासकीय तिजोरीतून जास्तीची रक्कम अदा करून घेतली आणि ती रक्कम स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर वळवून घेतली. प्राथमिक चौकशीमध्ये ही रक्कम २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चाैकशीनंतर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले गुन्हे...
या प्रकरणाची उदगीर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी चाैकशी केली. चाैकशीअंती त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये कलम ३१८(४), ३१६(४), ३३६(३) (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये राहुल गोविंदराव वागदरे (लिपिक), ब्रिजकिशोर ठाकूर (लिपिक), दत्तात्रय मारुती क्षीरसागर (लिपिक) आणि अजय दिगंबर सूर्यवंशी (श्रेणी पोलिस उपनिरीक्षक) यांचा समावेश आहे. यांतील तिघा आराेपींना तातडीने अटक करण्यात आली.
Web Summary : ₹2.38 crore embezzlement exposed in Latur police salary distribution. Four cops booked; three arrested. They manipulated records over ten years, siphoning funds into personal accounts. Investigation underway, revealing unauthorized withdrawals of allowances and salary arrears.
Web Summary : लातूर पुलिस वेतन वितरण में 2.38 करोड़ रुपये का घोटाला उजागर। चार पुलिसकर्मी गिरफ्तार; तीन हिरासत में। दस वर्षों से रिकॉर्ड में हेरफेर, निजी खातों में धन अंतरित। भत्ते और वेतन बकाया की अनधिकृत निकासी का खुलासा।