बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:13+5:302021-06-11T04:14:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी ...

Initiative of 22 villages for BBF sowing | बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी बीबीएफ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी गावांची आणि शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स असले तरी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० हेक्टर्स इतकी आहे. यापैकी ५ हजार हेक्टर्स बागायती जमीन असल्याने सर्वसाधारणपणे २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगामाच्या पेरणीचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला असून, २८ हजार ३८५ हेक्टर्सवर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रायोगिक तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी २२ गावांमधील दीड हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

उत्पादन वाढीसाठी दुहेरी फायदा...

बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे रूंद सरी वरंबा पध्दत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा लवकर होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे नाही. शिवाय पाऊस कमी झाला तर सरीमध्ये थांबलेल्या पाण्याचा पिकाला उपयोग होतो.

हेक्टरी एक हजार रुपये अनुदान....

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४८ गावे आहेत. त्यापैकी २२ गावांतील शेतकऱ्यांची बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी शासनाने पोखरा योजनेंतर्गत हेक्टरी एक हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, एका शेतकऱ्याला दोन हेक्टरची मर्यादा दिली आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर्सवर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांंडे यांनी सांगितले.

Web Title: Initiative of 22 villages for BBF sowing