‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 01:46 IST2025-11-27T01:45:35+5:302025-11-27T01:46:46+5:30
रेणापूर तालुक्यातील खलंग्रीची घटना, किनगाव ठाण्यामध्ये दाेघांविरुद्ध गुन्हा

‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
किनगाव / अंधाेरी (जि. लातूर) : ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून खलंग्री (ता. रेणापूर) येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याची तब्बल ३० लाख ५०० रुपयांना फसवणूक झाल्याची घटना घडली. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुधवारी पाेलिसांनी दिली.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील उच्चशिक्षित शेतकरी सतीश भिवाजी बोळंगे (वय ४२) यांना दिनेश प्रकाश पतंगे आणि तन्वी नितीन साळुंके या दाेघांनी ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून ज्यादा परताव्याचे अमिष दाखविले. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित लोकांनी पैसे गुंतवणूक केल्याचे आणि त्यांना परतावा मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यातून त्यांना अधिकच्या पैशांचे आमिष दाखवत ऑनलाईन गेमिंगच्या खेळाच्या गुंतवणुकीत ओढले. या खेळात २५ जुलै ते २४ ऑक्टोबर २०२५ या काळात वेगवेगळ्या युपीआयडी, फोन-पेवर त्याचबराेबर बँक खात्यावर वेळोवेळी पैसे मागून तब्बल एकूण ३० लाख ५०० रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी सतीश बाेळंगे यांच्या लक्षात आले.
याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुरनं. २६४ / २५ कलम ३१८ (४) बीएनस २०२३ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार दोघांविराेधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद मेहत्रेवार हे करत आहेत.
ज्यादा परताव्याचे आमिष; फाेन-पे, युपीआयडीचा वापर...
खलंग्री येथील उच्चशिक्षित असलेले तरुण शेतकरी सतिश बाेळंगे यांना दिनेश प्रकाश पतंगे व तन्वी नितीन साळुंके यांनी ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले. शिवाय, या ऑनलाईन गेमिंगमध्ये अनेक प्रतिष्ठितांनी पैसे गुंतवल्याचे सांगितल्याने विश्वास वाटला. त्यानंतर त्याने पैसे गुंतवायला प्रारंभ केला. टप्प्या-टप्प्याने ३० लाख ५०० रुपये गुंतविले. यासाठी आराेपींनी वेगवेगळ्या यूपी आयडी, फाेन-पे वापरले.
फसवणूक झाल्याचे कळले; किनगाव ठाण्याकडे धावले...
तीन महिन्यांच्या काळात अधिकचा परतावा काही मिळाला नाही. ताे मिळेल याच आशेवर तक्रारदार शेतकऱ्याने पैसे गुंतविल्याचे समाेर आले. पैसे गुंतवत गेल्याने त्यातून बाहेरही पडता आले नाही. अखेर ३० लाखांना दाेघांनी गंडा घातल्याची खात्री पटली आणि फसवणूक झाल्याचे समाेर आले. त्यावेळी किनगाव पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.