३३ गावांतील रुग्णांसाठी वलांडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:42+5:302021-04-30T04:24:42+5:30

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ...

Give the status of rural hospital to Valandi Health Center for patients from 33 villages | ३३ गावांतील रुग्णांसाठी वलांडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

३३ गावांतील रुग्णांसाठी वलांडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे, असा ठराव देवणी पंचायत समितीने घेतला आहे. येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण झाल्यास ३३ गावांतील व परिसरातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या केंद्रा अंतर्गत ८ उपकेंद्रे आहेत. ३३ गावांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. याशिवाय सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील रुग्णही येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होतात. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा परिस्थितीतही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कमी प्रमाणात असतानाही आरोग्य सुविधा तत्काळ देण्यात येत आहेत.

परिणामी, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडत असल्याने येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी २५ मार्च रोजी विशेष ग्रामसभा घेऊन पंचायत समितीकडे दाखल केला होता. या ठरावाची दखल घेऊन पंचायत समितीच्या सभापती सविता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वलांडीत ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा ठराव घेतला आणि पुढील मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.

जिल्हा परिषदेकडील ठराव प्रलंबित...

वलांडी येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने ठराव सादर केला होता. तेव्हा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करून ३ सप्टेंबर २०१९ रोजी तो आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच आहे. येथील आरोग्य केंद्रावरील रुग्णसंख्येचा ताण व सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सरपंच राणीताई भंडारे, मोहम्मद रफी सय्यद, उपसरपंच महेमुद सौदागर यांनी दिली.

Web Title: Give the status of rural hospital to Valandi Health Center for patients from 33 villages