लातूरमध्ये वंध्यत्व निवारणासाठी गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगावर मोफत लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:03 IST2025-08-08T12:03:04+5:302025-08-08T12:03:58+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया; महिला रुग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद

लातूरमध्ये वंध्यत्व निवारणासाठी गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगावर मोफत लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया
लातूर : गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगामुळे गर्भधारणेची समस्या निर्माण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे एका महिलेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे वंध्यत्व निवारण होत असल्याने महिला रुग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभाग, इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट्स (आयएईजीई), फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय), लातूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटी (एलओजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईगल प्रोजेक्टअंतर्गत एक दिवसीय लेप्रोस्कोपी व हिस्टोरोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया कार्यशाळा बुधवारी घेण्यात आली.
कार्यशाळेसाठी प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख तथा लातूर स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. भाऊराव यादव, सचिव डॉ. स्वप्ना कदम यांनी पुढाकार घेतला होता. यशस्वीतेसाठी डॉ. मुशीर शेख, डॉ. विष्णू तारसे, डॉ. शीतल लाड, डाॅ. सुचिता सूर्यवंशी, डॉ. रामदास पांचाळ यांच्यासह पदव्युत्तरचे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
८ जटिल, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया...
कार्यशाळेत जटिल आणि गुंतागुंतीच्या ८ महिलांवर लेप्रोस्कोपी व हिस्टोरोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात डॉ. कल्याण बरमदे, डॉ. राजेश दरडे, डॉ. नितीन शहा, डॉ. कृष्णा मंदाडे, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. कुणाल जाधव, डॉ. अनिता पवार यांनी शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ज्ञ डॉ. विनायक सिरसाट, डॉ. किरण तोडकरी, डॉ. सुरेखा मोरे यांनी सहकार्य केले.
२५ प्राध्यापक सहभागी...
स्त्रीराेग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एमआयएमएसआर, अंबाजोगाईतील एसआरटीसी वैद्यकीय महाविद्यालयातील २५ प्राध्यापक आणि ५५ पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात आठ जटिल आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
- डॉ. भाऊराव यादव, विभागप्रमुख, प्रसूती व स्त्रीरोग.