बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 03:31 IST2025-07-02T03:30:21+5:302025-07-02T03:31:47+5:30
पोलिसांचा फौजफाटा असूनही अधिकाऱ्यांचे पथक रिकाम्या हाताने परतले...

बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
लातूर : नागपूर-रत्नागिरी या शक्तीपीठ महामार्गाला लातूरच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, लातूर तालुक्यातील ढोकी (येळी) येथे जमीन मोजणीसाठी मंगळवारी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला. मोजणी रोखून धरली. लातूर तालुक्यातील १२ गावातील बाधित शेतकऱ्यांसह शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्गात लातूर तालुक्यातील गांजूर, रामेश्वर, दिंडेगाव, कासार जवळा, ढोकी, काटगाव, मांजरी, चिंचोली (ब.), गातेगाव, मुरुड अकोला, चाटा, भोयरा, बोपला आदी गावांतील जमीन जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावे या महामार्गात बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे. असे असतानाही मंगळवारी ढोकी (येळी) जमीन मोजणीसाठी उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे व त्यांचे पथक आले होते. पण ढोकी व परिसरातील अनेक गावांतून एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला. तत्पूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या मोजणीसाठी रितसर नोटीस दिली होती. या गावात मोजणीची तारीख निश्चित केली होती. परंतु, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थित आम्ही महामार्गासाठी जमीन देणार नाही. हा महामार्ग रद्द करण्यात याव्या, आमच्या जमिनी बागायती असून मांजरा प्रकल्पाच्या डावा आणि उजव्या दोन्ही कालव्याचे लाभक्षेत्र या तालुक्यात आहे. आमच्या उपजीविकेचे साधन ही जमीन आहे. या महामार्गात जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत. शिवाय शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे आम्ही महामार्ग होऊ देणार नाही. एकही इंचही जमीन महामार्गासाठी देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तसे निवेदनही उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे यांना जागेवर दिले. शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध लक्षात घेता मोजणीसाठी आलेल्या पथकाला परतावे लागले. शेतकऱ्यांनी अक्षरश: मोजणी हाणून पाडली.
या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे भाई ॲड. उदय गवारे, संघर्ष समितीचे ॲड. गजेंद्र येळकर, धर्मराज पाटील, अनिल ब्याळे, आप्पा मुंडे, ॲड. विजय जाधव, संतोष ब्याळे, शेखर ब्याळे, अनिल लटपटे, रवि मगर, सचिन कराड, खंडू भिसे, बस्वराज झुंजारे, सुभाष हजारे यांच्यासह बाधित शेतकरी शिंदे, राहुल शिंदे, विकास शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, श्रीराम शिंदे, गोपीचंद शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.