शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे! लातूरमध्ये ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने विद्यार्थिनीला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:38 IST2026-02-26T12:34:54+5:302026-02-26T12:38:47+5:30

लातूर रिंग रोडवर काळाचा घाला, नराधम चालकावर गुन्हा दाखल

Education dreams remain unfulfilled! A student was crushed by a tractor transporting sugarcane in Latur | शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे! लातूरमध्ये ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने विद्यार्थिनीला चिरडले

शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे! लातूरमध्ये ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने विद्यार्थिनीला चिरडले

लातूर : शिक्षणाची ओढ अन् डोळ्यांत भविष्याची स्वप्ने घेऊन निघालेल्या एका २३ वर्षीय तरुण विद्यार्थिनीचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लातूरमधील रिंग रोडवर मंगळवारी रात्री घडली. तेजश्री अशोक पांचाळ (वय २३, रा. पळशी, ता. रेणापूर) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास ट्रक्टरचालकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, मंगळवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास तेजश्री ही ज्ञानेश्वर लहाने याच्याबराेबर दुचाकीवरून (एम.एच. २४ सी.सी. ९०११) गरुड चौक ते साई नाका या मार्गावरुन प्रवास करत हाेती. दरम्यान, एका हॉटेलसमोर समोरून येणाऱ्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एम.एच. २६ सी.वाय. २९८२) चालकाने अचानक अन् निष्काळजीपणे ट्रॅक्टर वळवले. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा जोराचा धक्का तेजश्री पांचाळ हिच्या दुचाकीला लागला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये तेजश्रीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात ज्ञानेश्वर लहाने याने दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टरचालक माधव पिराजी पवार याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुनील रेजीलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. जी.डी. चित्ते हे करत आहेत.

पळशी गावावर परसरली शाेककळा
अवघ्या २३ व्या वर्षी तेजश्रीचा अंत होणे, कुटुंबासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. शिक्षणासाठी लातूरला आलेल्या या लेकीचे आयुष्य अशा प्रकारे संपल्याने पळशी गावावर शोककळा पसरली आहे. ट्रॅक्टर चालक माधव पिराजी पवार याच्यावर हयगय आणि निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : लातूर: ट्रैक्टर दुर्घटना में शिक्षा का सपना अधूरा रह गया।

Web Summary : लातूर में गन्ने से लदे ट्रैक्टर की चपेट में आने से 23 वर्षीय छात्रा की मौत हो गई। ट्रैक्टर चालक पर लापरवाही का आरोप लगा है। इस दुखद घटना से पलशी गांव में शोक की लहर है।

Web Title : Latur: Student's dream of education cut short by tractor accident.

Web Summary : A 23-year-old student died in Latur after a tractor transporting sugarcane hit her scooter. The tractor driver has been charged with negligence. The tragic accident has cast a pall of gloom over Palshi village.