चक दे लातूर! युरोप टूरसाठी लातूरचा व्यंकटेश भारतीय हॉकी संघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:42 IST2025-07-02T19:40:56+5:302025-07-02T19:42:06+5:30
अभिमानास्पद! फाॅरवर्ड खेळणारा व्यंकटेश गोल करण्यात तरबेज असून, विरोधी संघाला चकवा देत मैदानावर हॉकी स्टीकच्या मदतीने बाॅल पळविण्यात पटाईत आहे.

चक दे लातूर! युरोप टूरसाठी लातूरचा व्यंकटेश भारतीय हॉकी संघात
- महेश पाळणे
लातूर : प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देत गोलमध्ये रुपांतर करण्याची किमया साधणाऱ्या लातूरच्या व्यंकटेश धनंजय केंचे याने हाॅकीत मैदान मारले असून, नेदरलँड येथे होणाऱ्या युरोप टूरसाठी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे आता लातुरातून हाॅकीसाठी ‘चक दे लातूर’ असा आवाज घुमू लागला आहे.
चाकूर तालुक्यातील घरणी येथील व्यंकटेश केंचे याने नुकत्याच झाशी येथे झालेल्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अनेक गोल केले होते. या बळावरच त्याची ८ ते २० जुलैदरम्यान नेदरलँड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील युरोप टूरसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या तो बंगळुरू येथे भारतीय संघाच्या सराव शिबिरात सामील आहे. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणाऱ्या लातूरच्या व्यंकटेशने हाॅकी खेळात अनेक वेळा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अकरा वर्षांपासून तो क्रीडा प्रबोधिनीत हाॅकी खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. प्रथमच भारतीय संघात त्याची निवड झाल्याने हाॅकी खेळातही लातूर पॅटर्न पुढे येत आहे. त्याला माजी ऑलिम्पियन अजित लाकर, सागर कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे क्रीडा वर्तुळातून कौतुक होत आहे.
फॉरवर्ड म्हणून खेळणार
नुकतीच युरोप टूरसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, २० जणांच्या या चमूमध्ये लातूरच्या व्यंकटेशची फाॅरवर्डस् म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेश येथे क्लब टुर्नामेंट खेळली होती. यासह ज्युनिअर व सिनिअर गटात २० वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण व कांस्य पदके पटकावली आहेत. राज्य स्पर्धेतही त्याने अनेकवेळा मैदान गाजविले असून, ७ वेळा प्रथम येण्याचा बहुमानही पटकावला आहे. ४ वेळा त्याने ज्युनिअर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग नोंदविला आहे.
गोल करण्यात तरबेज
फाॅरवर्ड खेळणारा व्यंकटेश गोल करण्यात तरबेज असून, विरोधी संघाला चकवा देत मैदानावर हॉकी स्टीकच्या मदतीने बाॅल पळविण्यात पटाईत आहे. त्याचे हे कौशल्य संघाला अनेकवेळा फायद्याचे ठरले आहे. युरोप टूरमध्ये आयर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, इंग्लंड आदी संघांबरोबर भारताचे सामने होणार आहेत.
ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय
माजी भारतीय हाॅकी कर्णधार धनराज पिल्ले माझा आदर्श असून, भविष्यात ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे. युरोप टूरमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा मानस आहे. या निवडीत आई-वडिलांसह कुटुंब व प्रशिक्षकाचेही योगदान आहे.
- व्यंकटेश केंचे, हाॅकीपटू