ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 02:57 IST2025-07-03T02:57:03+5:302025-07-03T02:57:45+5:30
लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई...

ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात
लातूर : देवणी पाेलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील महाराष्ट्र काॅटन ॲक्टमधील आराेपी ओळख लपवून तब्बल ३० वर्षांपासून पाेलिसांना गुंगारा देत फरार हाेता. त्याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली.
देवणी पाेलिस ठाण्यात १९९४ मध्ये महाराष्ट्र काॅटन ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, यातील आरोपी गोविंद तुकाराम राठोड हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. ताे सतत राहते ठिकाण आणि ओळख लपवून पाेलिसांना गुंगारा देत फिरत हाेता. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा आढावा घेतला. त्यांना अटक करणयाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फरार आरोपींचा डेटा संकलित केला. १९९४ मध्ये देवणी पाेलिस ठाण्यात महाराष्ट्र कॉटन ॲक्टमधील एक आराेपी फरार हाेता.
आराेपी गोविंद तुकाराम राठोड (वय ५९, रा. ढोबळेवाडी, ता. गंगाखेड जि. परभणी) याला नवीन रेणापूर नाका परिसरातून पाेलिसांनी अटक केली. त्याला पुढील तपासासाठी देवणी पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, अंमलदार विनोद चलवाड, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे यांच्या पथकाने केली.