भारताने आशिया चषक जिंकताच कोल्हापुरात दसऱ्यापूर्वीच दिवाळी; तरुणाईचा जल्लोष, पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:15 IST2025-09-29T12:15:04+5:302025-09-29T12:15:29+5:30
फटाक्यांची आतषबाजी

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : भारतीय संघाने क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून आशिया चषक जिंकताच सलग तिसऱ्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणाईने तिरंगा फडकवत जल्लोष केला. चाहत्यांनी दसऱ्यापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली. ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रात्री १२ वाजल्यापासून तासभर हा जल्लोष सुरू होता.
दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक संघांत रविवारी झालेला अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. दहाव्या षटकात दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्मा याने षट्कार ठोकून भारताचा विजय निश्चित केला. त्यानंतर दोन धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंग याने चौकार लगावत या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात तरुणाईची गर्दी जमू लागली. हातात तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन तरुण दुचाकीवरून येऊ लागली. वाहनांचे हॉर्न आणि घोषणांमुळे जल्लोष वाढला. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ढोल आणि ताशांनी तरुणांचा उत्साह आणखी वाढला. अखेर मध्यरात्री पोलिसांनी तरुणाईला पांगवले.
पोलिसांचा लाठीमार
काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तरुणाच्या दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली. मात्र, या गोंधळात काहीजण दुचाकींवर पडले. त्यामध्ये ५ दुचाकीचे नुकसान झाले. रस्त्यावर चपलांचा खच पडला. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा जल्लोष सुरू झाला.
ट्रॅक्टर आणि बसस्टॉपवर उभे राहून नाच
ट्रॅक्टर, ओपन जीप तसेच शिवाजी चौकातील बसस्टॉपवर चढून तरुणांचा समूह नाचत होते. अनेकजण रिक्षातील संगीत लावून तरुणाई जल्लोष करत होती.