Kolhapur: गांजा विकणाऱ्या पैलवानाला सापळा लावून पकडले; सव्वा किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:45 IST2025-09-23T17:44:16+5:302025-09-23T17:45:06+5:30
वडिलांच्या निधनानंतर त्याची पैलवानकी थांबली

Kolhapur: गांजा विकणाऱ्या पैलवानाला सापळा लावून पकडले; सव्वा किलो गांजा जप्त
कोल्हापूर : ग्रामीण भागात गांजाची विक्री करणारा पैलवान प्रमोद पांडुरंग भोई (वय ३०, रा. तुकाराम चौक, मुरगुड, ता. कागल) याला पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सव्वा किलो गांजा, वजनकाटा, मोबाइल असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि. २१) सायंकाळी मुरगुड येथील पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार रोहित मर्दाने आणि विजय इंगळे यांना मुरगुड येथील पेट्रोल पंपाजवळ एक तरुण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली होती.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सापळा रचून प्रमोद भोई याला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे सव्वा किलो गांजा मिळाला. कर्नाटकातील होलसेल विक्रेत्याकडून गांजा आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. भोई याच्यावर मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, कर्नाटकातील होलसेल गांजा विक्रेत्याचा शोध सुरू आहे.
पैलवान बनला गांजाविक्रेता
प्रमोद भोई हा मुरगुडमधील नामांकित पैलवान आहे. त्याने अनेक मैदाने गाजवली होती. वडिलांच्या निधनानंतर त्याची पैलवानकी थांबली. पुण्यात खासगी कंपनीत काही काळ नोकरी करून तो गावाकडे परतला आहे. गेल्या तीन-चरा महिन्यांपासून गांजाची विक्री करीत असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.