Kolhapur Accident: ट्रॅक्टर दरीत कोसळून कामगार ठार, सहा जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:19 IST2025-11-18T17:19:04+5:302025-11-18T17:19:23+5:30
मासा बेलेवाडी ते बोळावी दरम्यान अपघात

Kolhapur Accident: ट्रॅक्टर दरीत कोसळून कामगार ठार, सहा जण गंभीर जखमी
मुरगूड : कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी ते बोळावीदरम्यान सुरू असणाऱ्या रस्त्यावरील कामावर कामगार घेऊन जाणारा ट्रॅक्टर पाण्याच्या टँकरसह घसरतीला दरीत कोसळून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार विजापूर जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता तयार करण्याचे काम करत आहेत. सदर घटनेची मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी, बोळावी ते बेलेवाडी मासादरम्यान नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणारे कामगार बोळावी या ठिकाणी राहत आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास या सर्व कामगारांना घेऊन ट्रॅक्टर पाण्याच्या टँकरसह बेलेवाडी मासा या गावाकडे जात होता. रस्त्यावरती प्रचंड मोठी घसरण आहे. या घसरतीला चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि हा ट्रॅक्टर टँकरसह दरीमध्ये कोसळला.
यामध्ये उमेश अशोक मोरे वय ४०, मु. पो. बळी, ता. इंडी, जि. विजापूर याचा जागीच मृत्यू झाला. तर माळाप्पा भासाप्पा तेली, मल्लापा सिदराम्मा संगोगी, राम दोडननी, हे (सर्वजण राहणार मु. पो. बळोळी, ता. इंडी, जि. विजापूर) स्वामलीम दळवाई, इरान्ना पाटील, प्रशांत मारुतू हे सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर धोकादायक पद्धतीने चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी ट्रॅक्टरचालक लखाफा हेळाप्पा डोळीन याच्यावर मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. अभियंता गणेश बसवराज बादरदिनी याने याबाबत फिर्याद दिली आहे.