Kolhapur: Kagal-Satara six laning: महामार्गाचे काम सुरु, पूर्ण करण्याची कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:47 IST2025-12-31T17:47:07+5:302025-12-31T17:47:25+5:30
अनेक महिन्यांपासून काम होते ठप्प

Kolhapur: Kagal-Satara six laning: महामार्गाचे काम सुरु, पूर्ण करण्याची कसोटी
सतीश पाटील
शिरोली : कागल-सातारा सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला, तरी विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. यातील काही कामे दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती; मात्र ती अर्धवट अवस्थेतच बंद पडली होती. दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता या रखडलेल्या कामांना पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील कागल ते पेठ नाकादरम्यानचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३५ टक्के काम ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे रोडवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे उद्दिष्टे आहे. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनीला मोठी कसरत करावी लागणार आहे.
शिरोली-सांगली फाटा, एचएमटी फाटा, एमआयडीसी अंबप, मंगरायाचीवाडी, तसेच घुणकी या परिसरातील बंद असलेल्या रस्त्याच्या कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. कागल बस डेपो, के.आय.टी. उजळाईवाडी, नागाव फाटा येथील उड्डाणपुलांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यास कागल, शिरोली, उजळाईवाडी आणि कोल्हापूर शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
विशेषतः औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी ही सहापदरी मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. काही महत्त्वाची आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड कामे अजूनही प्रलंबित असून, ती वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषतः टोप येथील सुमारे ३५० मीटर लांबीच्या फ्लायओव्हरचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
यासोबतच वारणा नदीवरील ब्रिज, लक्ष्मी टेकडी परिसर, तसेच कणेरी वाडी येथील कामेही जोखमीची आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड आहेत. या ठिकाणी भौगोलिक रचना, वाहतुकीची सततची वर्दळ होत आहे. त्यामुळे ही सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
३० जून २०२६ ही या कामाची अंतिम मुदत देण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी रोडवे कंपनीवर आहे. यासाठी कंपनीकडून अतिरिक्त यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळ आणि कामाचे टप्पे वाढवण्याची गरज भासणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
कागल–सातारा सहापदरीकरण महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १७ डिसेंबर रोजी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या अपूर्ण व बंद असलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
नव्या कामाची निविदा
सांगली फाटा ते उचगाव साडेतीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर आणि बास्केटब्रीज, तसेच कागल येथील फ्लाय ओव्हर, या कामाची निविदा १ जानेवारी २०२६ पर्यंत भरावयाची आहे. आणि जानेवारीअखेरपर्यंत हे काम कुणाला मिळाले हे कळेल.
तांत्रिक अडचणींमुळे काम बंद होते, पण आता शिरोली सांगली फाटा, एचएमटी फाटा, एमआयडीसी, अंबप, या ठिकाणी बंद असलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, कागल बस डेपो के. आय. टी. उजळाईवाडी नागाव फाटा येथील उड्डाणपुलांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. - महादेव चौगुले, प्रकल्प अधिकारी, रोडवे इन्फ्रास्ट्रक्चर.