कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:41 IST2025-06-30T12:39:11+5:302025-06-30T12:41:00+5:30

पोलिस कॉन्स्टेबलची फिर्याद, न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई

Woman dies during treatment in Kolhapur case registered against doctors | कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पूनम सुरेश काळे (वय ३०, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन डॉक्टरांसह मेडिकल मालकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २८) रात्री गुन्हा दाखल झाला.

पूनम यांचा २ ऑगस्ट २०२२ रोजी मृत्यू झाल्यानंतर फिर्याद दाखल होण्यास विलंब होत असल्याने त्यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल सुरेश गुलाब काळे (वय ३५, रा. राजेंद्रनगर) यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार शाहूपुरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.

मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. विलास श्रीधर नाईक, डॉ. श्रद्धा विलास नाईक (दोघे रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), हृदयविकार तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि मेडिकल मालक रविराज विनायक मायदेव (रा. नागाळा पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीस किडणीचा विकार झाल्याने डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ती स्वत:हून चालत हॉस्पिटलमध्ये गेली होती. हृदयास गाठ असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला भीती घातली. डॉ. नाईक आणि डॉ. साईप्रसाद यांनी उपचारात हलगर्जीपणा केला. बंद असलेले कोल्हापूर किडणी केअर ॲन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावे डायलेसिसचे बिल काढले. रुग्णास मुदतबाह्य औषधे दिली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

२ ऑगस्टला तिचा मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यानंतर बिलासाठी धनादेश जमा करून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे मृत्यू प्रमाणपत्र दिले. मृतदेहाची हेळसांड केली तसेच पोलिस ठाण्यास वर्दी दिली नाही, असा आरोप काळे यांनी फिर्यादीत केला आहे.

हॉस्पिटल प्रशासनाने आरोप फेटाळले

काळे यांनी केलेले सर्व आरोप खोटे व खोडसाळपणाचे आहेत. डॉक्टरांना त्रास देण्यासाठी त्यांनी मुद्दाम तक्रार केली आहे. पूनम काळे यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार झाले होते. याबाबतचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. योग्यवेळी पुरावे न्यायालयात हजर करू, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

Web Title: Woman dies during treatment in Kolhapur case registered against doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.