Kolhapur: सोन्याची चेन अन् प्लॉटबद्दल विचारणा केल्याच्या रागातून पत्नीला बेदम मारहाण, जखमी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:17 IST2026-02-17T17:16:37+5:302026-02-17T17:17:40+5:30

पतीच्या अटकेसाठी महिलेचे नातेवाईक आक्रमक, मृतदेह स्वीकारण्यास नकार

Woman dies after being beaten by husband in Kolhapur | Kolhapur: सोन्याची चेन अन् प्लॉटबद्दल विचारणा केल्याच्या रागातून पत्नीला बेदम मारहाण, जखमी महिलेचा मृत्यू

Kolhapur: सोन्याची चेन अन् प्लॉटबद्दल विचारणा केल्याच्या रागातून पत्नीला बेदम मारहाण, जखमी महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या स्वाती गणेश हुबाळे (वय ३४, रा.सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) यांचा उपचाराच्या दरम्यान सोमवारी (दि. १६) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या पतीला अटक करावी, असा आग्रह मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे धरला. मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रात्री उशिरा नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडी कामगार वसाहतीमधील स्वाती यांचा १६ ऑगस्ट २०१२ मध्ये शनिवार पेठेतील गणेश हुबाळे याच्याशी प्रेमविवाह झाला. त्यांना बारा वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. गळ्यातील सोन्याची चेन आणि आंबेवाडी (ता.करवीर) येथील प्लॉटबद्दल विचारणा केल्याच्या रागातून स्वाती यांना पतीने बेदम मारहाण केली. त्यानंतर, त्यांना उपचारासाठी कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. शरीरातील अंतर्गत रक्तस्रावामुळे सोमवारी दुपारी उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी पती गणेश याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तातडीने अटक करावी, असा आग्रह पोलिसांकडे धरला. त्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला. याबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

राजकीय दबावाचा आरोप

मृत स्वाती यांच्या पतीचा कोल्हापुरी फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊ नये, यासाठी एका राजकीय नेत्याकडून तो पोलिसांवर दबाव टाकत होता, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

Web Title : कोल्हापुर: सोने की चेन और प्लॉट के बारे में पूछने पर पत्नी की बेरहमी से पिटाई, मौत

Web Summary : कोल्हापुर में एक महिला की मौत हो गई, क्योंकि उसके पति ने सोने की चेन और प्लॉट के बारे में पूछताछ करने पर बेरहमी से पिटाई की थी। रिश्तेदारों ने पहले पति की गिरफ्तारी की मांग करते हुए शव लेने से इनकार कर दिया। पुलिस ने कार्रवाई का आश्वासन दिया, जिससे तनाव कम हुआ।

Web Title : Kolhapur: Wife Dies After Husband's Brutal Assault Over Gold Chain, Plot Query

Web Summary : A Kolhapur woman died after her husband brutally assaulted her over a gold chain and plot inquiry. Relatives initially refused to claim the body, demanding the husband's arrest. Police assured action, calming tensions.