ताराराणी समाधीस्थळ विकासाचा ५० कोटींचा प्रस्ताव पाठवणार, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:06 IST2025-05-17T13:05:02+5:302025-05-17T13:06:31+5:30
खासदार शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत बैठक

ताराराणी समाधीस्थळ विकासाचा ५० कोटींचा प्रस्ताव पाठवणार, सातारा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
कोल्हापूर : संगममाहुली (जि. सातारा) येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाजवळ आणखीन तीन समाधी केल्या जातील. समाधी जीर्णोद्धारासाठी शासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले आहे, पण उर्वरित विकास कामांसाठी आणखी २३ कोटींची गरज आहे. असा एकूण ५० कोटींचा विकास आराखडा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला जाईल व लोकभावनेचा आदर करून समाधी स्थळाची कामे लवकर पूर्ण केली जातील असा शब्द साता-याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शुक्रवारी दिला. यावेळी खासदार शाहू छत्रपती, कोल्हापूरचेजिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीपूर्वी सर्वांनी ताराराणींच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. बैठकीला छत्रपती महाराणी ताराराणी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष विजय देवणे, शिवशाहीर राजू राऊत, उदय गायकवाड, हर्षल सुर्वे, प्रमोद पाटील, शुभम शिरहटी, सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, उदय नारकर सार्वजनिक बांधकाम व महसूल अधिकारी उपस्थित होते.
आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर यांनी समाधी स्थळाचे व नियोजित आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी समिती सदस्यांनी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधी जवळ त्यांच्या जीवनावरील इतिहास शिलालेखांमध्ये कोरलेला असावा तसेच ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा या शिलालेखाजवळ बसवण्यात यावा, संगममाहुली समाधीस्थळी वाहतुकीचा रस्ता किमान शंभर फुटी असावा अशा सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नदीच्या दोन्ही तीरावर पूल करण्यात येईल त्याचे नियोजन शासनाने केले असल्याचे सांगितले.