Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; मुले आईविना पोरकी, सांगली जिल्ह्यातील दाम्पत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:05 IST2026-01-23T12:04:15+5:302026-01-23T12:05:34+5:30
घटनेनंतर त्याने दानोळी येथील आपल्या मामांना फोन करून कृत्याची माहिती दिली

Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; मुले आईविना पोरकी, सांगली जिल्ह्यातील दाम्पत्य
जयसिंगपूर: 'फिरायला जाऊया' असे सांगून पत्नीला निर्जनस्थळी नेऊन, तिच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची दगड आणि धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तुकाई डोंगरावर उघडकीस आली.
सायराबानू उमर पुळूस्कर (वय २७, रा. बोर्गी, ता. जत, जि. सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिचा पती उमर मैनुद्दीन पुळूस्कर (वय २८) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी उमर पुळूस्कर हा पत्नी सायराबानूच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद होते. गुरुवारी उमरने 'दानोळी येथील मामाकडे जायचे आहे' असे सांगून सायराबानूला सोबत घेतले. वाटेत तिला निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर नेले. त्याने सायराबानूच्या डोक्यात दगड घातला तसेच धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिचा खून केला.
घटनेनंतर त्याने दानोळी येथील आपल्या मामांना फोन करून कृत्याची माहिती दिली. मामांनी तातडीने निमशिरगावच्या पोलिस पाटलांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पथक रात्री साडेनऊच्या सुमारास तुकाई डोंगरावर पोहोचले. तिथे रक्ताच्या थारोळ्यात सायराबानूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित पती उमर पुळूस्कर याला जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चारित्र्याच्या संशयातून हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जयसिंगपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुले आईविना पोरकी
मृत सायराबानू हिला दोन मुले आणि अवघ्या तीन महिन्यांची एक लहान मुलगी आहे. या घटनेची माहिती मिळताच निमशिरगाव आणि दानोळी परिसरातील नागरिकांनी डोंगराच्या पायथ्याशी मोठी गर्दी केली होती.