Kolhapur: पत्नी सोडून गेली, हाताला काम नाही.. मूकबधिर मुलाला घेऊन जगू कसे..?; तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:17 IST2026-01-14T15:16:06+5:302026-01-14T15:17:09+5:30
पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, करुण कहाणीने पोलिसही हेलावले

Kolhapur: पत्नी सोडून गेली, हाताला काम नाही.. मूकबधिर मुलाला घेऊन जगू कसे..?; तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर : घटस्फोट घेऊन पत्नी सोडून गेली. हाताला काम मिळेना. कोणाचाच आधार नसल्याने चार वर्षांच्या मूकबधिर मुलाला घेऊन कसे जगू? अशा विवंचनेने हतबल झालेला तरुण मिथुन शामराव कुंभार (वय ३०, रा. माणगाव, ता. हातकणंगले) याने मंगळवारी (दि. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा न्यायालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून शाहूपुरी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेल्याने अनर्थ टळला.
जिल्हा न्यायालयासमोरील रोडवर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एक तरुण त्याच्या चार वर्षीय मुलाला सोबत घेऊन आला. काही वेळ तो न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घुटमळला. त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून घेऊन तो आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी समोरच्या रिक्षाचालकांनी आरडाओरडा केला. कामानिमित्त जिल्हा न्यायालयात निघालेले शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी तातडीने शासकीय गाडी थांबवली. हवालदार नितीन सावंत आणि कॉन्स्टेबल सूरज आबिटकर यांनी तातडीने धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या तरुणाला पकडले. त्याच्याकडील रॉकेलचा कॅन आणि काडीपेटी काढून घेतली.
त्याला गाडीत बसवून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. हा प्रकार घडताच रस्त्यावर गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्याचे समुपदेशन करून मुलाच्या पुनर्वसनाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
करुण कहाणीने पोलिसही हेलावले
पोलिस ठाण्यात पोहोचताच पोलिसांनी कुंभार याला रॉकेलने भिजलेली कपडे बदलायला लावली. त्याला आणि त्याचा मुलाला नाष्टा देऊन काही वेळ शांत बसवले. त्यानंतर त्याने सांगितलेली करुण कहाणी ऐकून पोलिसही हेलावले. स्वत: अनाथाश्रमात वाढलेल्या मिथुनचे लग्न झाले होते. 'सहा महिन्यांपूर्वीच पत्नी घटस्फोट घेऊन निघून गेली. मूकबधिर असलेल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करीत तो काम मिळेल तिथे राहतो.
मात्र, लहान मुलगा सोबत असल्याने कुणी काम देत नाही. एकल पालकत्वामुळे बालकल्याण संकुलातही मुलाला प्रवेश मिळाला नाही. कडाक्याच्या थंडीत मुलाला घेऊन आठवडाभर मध्यवर्ती बसस्थानकात दिवस काढले. हाताला काम मिळेना, खिशात पैसे नाहीत. मुलाचा सांभाळ कसा करू? सगळे उपाय थकल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला,' असे त्याने पोलिसांना सांगितले.