Kolhapur- पावणेनऊ कोटी कोणाच्या देवाचे?, भूसंपादन विभागापुढे पेच; ११ देवस्थानांची माहिती मिळेना

By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 6, 2023 06:05 PM2023-07-06T18:05:16+5:302023-07-06T18:06:44+5:30

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर व हातकणंगले या तालुक्यांमधील ४९ गावांमध्ये होत असलेल्या भूसंपादनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्यादेखील जमिनी संपादित होत आहेत

Whose god's fifty-nine crores?, embarrassment before the land acquisition department; No information about 11 temples | Kolhapur- पावणेनऊ कोटी कोणाच्या देवाचे?, भूसंपादन विभागापुढे पेच; ११ देवस्थानांची माहिती मिळेना

Kolhapur- पावणेनऊ कोटी कोणाच्या देवाचे?, भूसंपादन विभागापुढे पेच; ११ देवस्थानांची माहिती मिळेना

googlenewsNext

इंदुमती गणेश

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनात विभागावर अरे देवा, पावणेनऊ कोटी कोणाच्या देवाचे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. भूसंपादनात वेगवेगळ्या देवस्थानांचीही जमीन जात असून त्याची रक्कम १७ कोटी २४ लाख १७ हजार ६९३ इतकी आहे. त्यातील ८ कोटी ३० लाख रुपये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडील देवालयांचे आहेत; पण उरलेल्या ११ देवस्थानांच्या वेगवेगळ्या गटनंबरमधील जमिनी कोणाच्या अखत्यारित आहेत हे कळत नसल्याने ८ कोटी ९४ लाख ४ हजार ९७० ही भली मोठी रक्कम कोणाला वर्ग करायची असा पेच आहे.

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर व हातकणंगले या तालुक्यांमधील ४९ गावांमध्ये होत असलेल्या भूसंपादनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्यादेखील जमिनी संपादित होत आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील मंदिरांचाही समावेश आहे.

समितीकडील १७ देवालयांच्या संपादित जमिनींची रक्कम ८ कोटी ३० लाख १२ हजार ७२३ इतकी झाली असून ही रक्कम समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे; पण उरलेली ११ देवालये कोणत्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतात याची माहिती उपलब्ध नसल्याने विभागाने तीन महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे या देवस्थानांची मालकी आपल्याकडे आहे का? याची माहिती मागितली आहे. 

वहिवाटदारांची नावे कशी?

ही देवालये नेमकी कुणाची, ती कोणाच्या अखत्यारित येतात याची माहिती भूसंपादन विभागाकडे नाही. देवस्थानाला कूळ कायदा लागू होत नाही, अनेक देवस्थानांच्या सातबारा उताऱ्यावर देवासोबत वहिवाटदारांची नावे आली आहेत. ही नावे कशी आली हे कळत नाही. त्यासाठी जुने रेकॉर्ड तपासावे लागणार आहे.

धर्मादायकडून उत्तरच नाही..

भूसंपादन विभागाने २३ फेब्रुवारीला देवस्थान समिती व धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाला याबाबतचे पत्र पाठवले आहे. यात संपादित जमिनीची नुकसानभरपाई रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने यादीतील ज्या देवस्थानांच्या नोंदी आपल्याकडे आहेत त्यांची माहिती कळवावी असे नमूद केले आहे. यावर अजून धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने उत्तर दिलेले नाही.

या देवस्थानांचा प्रश्न..

केर्ले (ता. शाहूवाडी) : खामजाईदेवी, श्रीदेव होळीकाटा, पावणाईदेवी. चांदोली : चांदोबा देव, श्रीदेव होळीकाटे, वारुळ : देव वारुळेश्वर, येलूर : भैरीदेव, वाडीचरण : महादेव, टोपेश्वर देव आंबवडे : भाबाई देव. केर्ले (करवीर) : मारुतीदेव

तालुकानिहाय देवस्थानांचे क्षेत्र व रक्कम

तालुका : क्षेत्र (चौरस मीटर) : रक्कम

शाहूवाडी : २३ हजार ००८ : ११ कोटी ६९ लाख ३५ हजार २९०
पन्हाळा : ५ हजार १०६ : २ कोटी २० लाख २ हजार १०८
करवीर : ५९८ : १९ लाख ८७ हजार ६७०
हातकणंगले : ७ हजार ६७१ : ३ कोटी १४ लाख ९२ हजार ६२५
एकूण : ३६ हजार ३८३ : १७ कोटी २४ लाख १७ हजार ६९३
 

Web Title: Whose god's fifty-nine crores?, embarrassment before the land acquisition department; No information about 11 temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.