Kolhapur: गेम कोणाचा करायचा, कट शिजतोय कळंबा जेलमध्ये; गुन्हेगारी टोळक्यांचे रिमोट कारागृहातील दादांकडे
By सचिन यादव | Updated: July 18, 2025 16:18 IST2025-07-18T16:17:44+5:302025-07-18T16:18:17+5:30
सचिन यादव कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि बिंदू चौक सबजेलच्या गजाआडच्या विश्वात गुन्हेगारी वर्तुळातील नव्या-जुन्या समाजकंटकांची चालती-बोलती शाळाच ...

Kolhapur: गेम कोणाचा करायचा, कट शिजतोय कळंबा जेलमध्ये; गुन्हेगारी टोळक्यांचे रिमोट कारागृहातील दादांकडे
सचिन यादव
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि बिंदू चौक सबजेलच्या गजाआडच्या विश्वात गुन्हेगारी वर्तुळातील नव्या-जुन्या समाजकंटकांची चालती-बोलती शाळाच बनली आहे. कारागृहात बसून कोणाचा गेम करायचा, हे संघटित गुन्हेगारीतील म्होरके ठरवितात. काहींना गुन्हेगारीचे प्रशिक्षण कारागृहांतील दादांकडून दिले जाते. पाच जिल्ह्यांतील गुन्हेगारीचा रिमोट हा दोन्ही जेलमधील काही टोळी म्होरक्यांकडे आहे.
दोन वर्षांच्या कालावधीत कळंबा कारागृहात कैद्यांकडे २५० हून अधिक मोबाइल सापडले. त्यासह तंबाखूच्या पुड्यांत वीस किलोहून अधिक गांजा सापडला. कारागृहात गांजा पार्टी झाल्याच्या घटनाही यापूर्वी उघडकीस आल्या. टोळी युद्धातून पाच खून कारागृहात आवारात घडले. टोळी युद्धातील काही म्होरके कारागृहात दाखल झालेल्या नवख्यांना प्रशिक्षण देतात. येथे प्रशिक्षण घेऊन गावांत जाऊन संघटित टोळी तयार केली जाते. चोरी, खून, दरोड्याचे नवे तंत्रज्ञानही सराईत गुंडाकडून दिले जाते.
सुरक्षा कवच भेदतात
बाहेरून कैद्यांना मदत पुरविण्यासाठी भिंतीजवळून संबंधित साहित्य कापडी गठ्ठ्यातून आत फेकले जाते. हे रोखण्यासाठी जाळीचे सुरक्षा कवच असले, तरीही काही सराईत टोळके कवच भेदून साहित्य फेकतात.
कारागृहात काय फेकतात?
गांजा, मोबाइल संच, पेन ड्राइव्ह, चार्जिंग कॉड, एमसीलच्या पुड्या, चाकू, हत्यारे, ब्लेड.
कारागृहात २००१ कैदी
कळंबा मध्यवर्ती कारागृहात २००१ कैदी आहेत. कारागृहाची क्षमता १६६५ इतकी आहे. त्यात महिला कैदी ३४ आणि पुरुष कैदी १६६५ आहेत. कारागृहाचा परिसर १०० एकर परिसरात आहे. प्रत्यक्षात २५ एकर क्षेत्रात भक्कम तटबंदी आहे.
परदेशी कैदी
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, पुणे मराठवाडा, विदर्भासह बांगलादेशी, नायझेरियन, श्रीलंका येथील कैदी आहेत. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. मुंबई बॉम्बस्फोट, कुविख्यात तस्कर, खून, मारामारी, टोळी युद्धासह गुन्हेगारी जगतातील म्होरके बंदिस्त आहेत.
७०० सीसीटीव्ही कॅमेरे, १०० हॉटस्पॉट
कैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण कारागृह परिसरात ७०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यासह मोबाइल जामर, कैद्यांना गरम जेवण देण्यासाठी १०० हॉटस्पॉट आहेत.
तीन शिफ्टमध्ये चालते काम
कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पाॅइंटवर दोन कर्मचारी नेमले जातात. त्यांची तीन तासांनी ड्यूटी बदलते. सकाळी सहा ते बारा, दुपारी बारा ते सहा आणि सायंकाळी सहा ते पहाटे सहापर्यंत तीन शिफ्टमध्ये कामकाज चालते.
२४०० कॅलरीचा डाएट
कैद्यांना दिवसभरात २४०० कॅलरी मिळतील, इतका आहार दिला जातो. त्यानुसार उपहारगृहात खाद्यपदार्थ तयार केले जातात.
सबजेलमध्ये सावळा गोंधळ
बिंदू चौकातील कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) मध्ये १८० कैदी आहेत. मात्र, क्षमता १२५ इतकी आहे. यामध्ये कच्चे कैद्यांची संख्या अधिक आहे. मात्र, अमली पदार्थ, हत्यारे, मारामारीचे प्रकारही या कारागृहात घडले आहेत. काही कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
अपुरा कर्मचारीवर्ग
२००१ कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी कळंबा कारागृहात केवळ ३३७ अधिकारी, कर्मचारी आहेत. कारागृह शिपायांची २०९ पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात ७२ जण कार्यरत आहेत.
कारागृहातील कुविख्यात अनेक टोळीच्या म्होरक्यांवर प्रशासनाची करडी नजर आहे. कारागृहात बसून अन्य ठिकाणच्या गुन्हेगाराच्या रिमोट आपल्या हाती ठेवणाऱ्या ५० टोळीच्या म्होरक्यांना अन्य कारागृहात वर्ग केले आहे. रोज झडती सुरू असून ७०० हून अधिक सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे अशा प्रकारावर आळा घातला आहे. - नागनाथ सावंत, वरिष्ठ अधीक्षक, कळंबा कारागृह