Kolhapur: कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत?, महायुतीतील माजी आमदाराचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:28 IST2025-07-07T12:22:22+5:302025-07-07T12:28:20+5:30
नेत्यांनी घेतला ‘गोकुळ,’ शेतकरी संघाचा आढावा

Kolhapur: कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत?, महायुतीतील माजी आमदाराचे वक्तव्य
कोल्हापूर : आगामी श्रावण महिना, सणासुदीचा कालावधी पाहता म्हैस दुधाची मागणी वाढणार आहे. त्या दृष्टीने दूधसंकलन वाढीसाठी प्रयत्न करा, अशी सूचना नेत्यांनी ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांना केली. ‘गोकुळ,’ शेतकरी संघाच्या कामकाजाचा रविवारी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी आढावा घेतला.
‘गोकुळ’ची ठेव व गुंतवणूक ५१२ कोटींपर्यंत पोहोचली असून, यंदा संघाला ११ कोटी ९७ लाखांचा नफा झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना रिबेटमध्ये प्रतिलिटर २० पैसे जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा दिवाळीला म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २.४५ रुपये, तर गाय दूध उत्पादकांना १.४५ रुपये मिळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी संघ अध्यक्षांचे कौतुक
शेतकरी संघाने गेल्या महिन्याभरात रुकडी खत कारखान्यातून दीड हजार टन खताचे उत्पादन घेतले असून, भाग भांडवलाच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटींचे भांडवल व्यवसायासाठी मिळू शकते, असे अध्यक्ष प्रा. बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. संघाच्या कामाला गती दिल्याबद्दल अध्यक्षांसह संचालकांचे नेत्यांनी कौतुक केले.
बाजार समितीतील सुविधांवर चर्चा
बाजार समितीतील रस्ते, गटारींसाठी पणन विभागाने निधी देण्यासाठी पणनमंत्र्याकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी केली. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत महावितरणच्या पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत?
बाजार समितीच्या सभापतींचा निर्णय एकमुखाने घेणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ‘तुमच्यामध्ये सतेज पाटील सोडून ना?’ असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर, क्षणाचाही विलंब न लावता के. पी. पाटील म्हणाले, ‘कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत? ते आमचेच आहेत.’