Kolhapur: ५७ कोटींचा बनावट धनादेश, माहिती देणारे कोण?; पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:02 IST2025-03-24T12:01:53+5:302025-03-24T12:02:22+5:30
मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता

Kolhapur: ५७ कोटींचा बनावट धनादेश, माहिती देणारे कोण?; पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बनावट धनादेशांचा वापर करून ५७ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटमधील एका संशयिताच्या अटकेनंतर शाहूपुरी पोलिस या गुन्ह्याच्या सूत्रधाराच्या शोधात आहेत. बनावट बँक खाती काढून बनावट धनादेशाद्वारे रक्कम हडपणारे पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. पण, त्यांना जिल्हा परिषदेच्या धनादेशांची माहिती देणारे आणि मोठ्या रकमेचा धनादेश पास करणारे बँकेतील कर्मचारी अजूनही मोकाट आहेत. ते संशयितही लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.
विविध प्रकारची आमिषे दाखवून किंवा डिजिटल अटकेची भीती घालून ऑनलाइन गंडा घातल्याचे अनेक प्रकार आजवर घडले आहेत. मात्र, अशा गुन्ह्यांचे तपास फार पुढे गेलेले नाहीत. शहरातील एका उद्योजकास डिजिटल अटक करून त्याच्याकडून कोटीची रक्कम उकळण्याचा प्रकार घडला होता. त्या गुन्ह्यात उद्योजकाची काही रक्कम गोठवून ती परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. परंतु, आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकले नाहीत. बनावट धनादेशाद्वारे ५७ कोटींची रक्कम हडप करण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यात सर्व रक्कम सुरक्षित ठेवण्यात पोलिसांना यश आले.
त्यानंतर बनावट कंपन्यांच्या नावे बँक खाती उघडणारे आणि बनावट धनादेश बँकेत भरणाऱ्या संशयितांपर्यंत पोलिस पोहोचले. यातील कपिल चौधरी याला उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून फसवणूक करणाऱ्या टोळीतील काही एजंट आणि म्होरक्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
आता स्थानिक संशयितांचा शोध
उत्तर प्रदेशातील भामट्यांना जिल्हा परिषदेच्या धनादेशाची माहिती कशी मिळाली? धनादेशाचा नंबर, त्यावरील सह्यांचे नमुने देणारे स्थानिक संशयित कोण आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले. पाच लाखांवरील धनादेश असल्यास तो संबंधित कार्यालयाकडे चौकशी केल्याशिवाय बँकेकडून पास केला जात नाही. मग जिल्हा परिषदेचा मोठ्या रकमेचा धनादेश कसा पास झाला? यात बँकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे काय? याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. गाझियाबादमधील टोळीचा म्होरक्या हाताला लागताच त्याला मदत करणाऱ्या स्थानिक संशयितांचीही माहिती मिळेल, असे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
पोलिसांची दिल्लीपर्यंत धाव
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बँक खाते काढणारे वेगळे असतात. फसवणुकीसाठी त्यांचा वापर करणारे दुसरे आणि पैसे काढून घेणारे तिसरेच असतात. हे सर्व संशयित देशात वेगवेगळ्या राज्यात बसून काम करतात. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास वेळखाऊ आणि आव्हानात्मक असतो. शाहूपुरी पोलिसांनी दिल्लीपर्यंत धाव घेऊन याचा तपास केल्याने प्रथमच अशा गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यश आले.