Kolhapur-Gokul election: वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करताना महायुतीच्या प्रमुखांचा लागणार कस
By विश्वास पाटील | Updated: March 3, 2026 16:26 IST2026-03-03T16:25:55+5:302026-03-03T16:26:31+5:30
संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनाच ही मोट बांधावी लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच असणार

Kolhapur-Gokul election: वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करताना महायुतीच्या प्रमुखांचा लागणार कस
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीचे पॅनेल आकार घेताना त्यामध्ये काही अंतर्गत विरोधांना सामोरे जावे लागणार आहे.
या विरोधातून नेते कसा मार्ग काढतात यावरच पॅनेलची रचना कशी होणार आणि लढत कशी होणार हे ठरणार आहे. कारण, ज्यांच्यामध्ये हा परस्पर विरोध आहे ते संघाच्या राजकारणातील मातब्बर आहेत. त्यातील एखादाही नेता इकडे-तिकडे सरकला तर त्याचा लढतीवर परिणाम होणार आहे. संघातील सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनाच ही मोट बांधावी लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावरच असणार आहे.
१. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात संघर्ष झाला. मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच मंडलिक-मुश्रीफ यांच्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. ते निवळले नाही, परंतु जिल्हा परिषदेत जास्त ढवळले. त्यामुळे शिंदेसेनेला सोबत घेताना मंडलिक काय भूमिका घेतात, याला महत्त्व आहे. त्याचे पडसाद पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार राजेश पाटील यांच्या निर्णयावरही पडणार आहेत.
२. गोकुळच्या राजकारणातील एकेकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे गेल्या निवडणुकीपासून महाडिक यांच्याशी आलेले वितुष्ट हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पाटील सध्या पक्षीयदृष्ट्या शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत आहेत, परंतु गोकुळमध्ये ते काय करणार, याचे पत्ते त्यांनी ओपन केलेले नाहीत.
विश्वास पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत गेल्याचा महाडिक यांना प्रचंड राग आहे. तो राग त्यांनी परवाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काढला आहे. पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांच्या पराभवासाठी त्यांनी राजाराम कारखान्याची यंत्रणा ताकदीने लावली होती. नुसती यंत्रणाच लावली नाही, तर आर्थिक बळाचाही वापर केल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. त्यामुळे महाडिक आणि आबाजी यांना सोबत घेताना मुश्रीफ यांना घाम फुटणार आहे.
३. तिसरे महत्त्वाचे म्हणजे ज्याच्याकडे ठराव किती त्यानुसार उमेदवार किती, हा निकष मुश्रीफ यांनी लावला आहे. महापालिका, जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांनी उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता व आर्थिक ताकद यावरच जास्त भर दिला. त्याच्या पक्षीय निष्ठेचा फार विचार केला नाही. तसाच विचार यावेळेलाही होऊ शकतो.
भाजपचा किमान नऊ जागांचा आग्रह आहे. तडजोड करून सातवर यायचे, परंतु त्याखाली नाही, अशी त्यांची साधारण रणनीती दिसते. संचालक मंडळात त्यांचे दोन संचालक आहेत, परंतु महाडिक गट म्हणून ताकद आणि मुख्यमंत्र्यांची व्हेटो पॉवर त्यांच्यासोबत आहे. परिणामी भाजप किती जागांसाठी आग्रही राहणार हा देखील पॅनेल बांधणीतील कळीचा मुद्दा ठरणारा आहे.
४. महायुतीअंतर्गत चंदगडला राजेश पाटील विरुद्ध आमदार शिवाजी पाटील, भुदरगडला पालकमंत्री आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील, करवीरला आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध राहुल पाटील, असे विधानसभेतील परस्परांचे विरोधक जिल्हा परिषदेला एकमेकांच्या विरोधात मैदानात ठाकले होते. त्यांची मोट बांधताना दमछाक होणार आहे.